Last Updated on 16 Feb 2025 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आर.आय.टी.च्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह व अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे गडकरींच्या हस्ते उद्गाटन
सांगली : राजारामनगर (इस्लामपूर) येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअम इमारतींचे उदघाटन सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जात असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत व महाविद्यालयाचे संचालक डॉ.पी.व्ही.कडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य आर.डी.सावंत म्हणाले,महाराष्ट्रा मध्ये प्रथमच प्री- इंजिनियर्ड बिल्डिंग या अत्याधुनिक आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञाना च्या साहाय्याने आरआयटीने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह बांधले आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य नमुना म्हणून या वास्तूचा उल्लेख होणार आहे. या ६ मजली इमारतीचे साधारण ७० हजार स्क्वेअर फूट बांधकाम असून या इमारतीमध्ये २०८ विद्यार्थी रहाणार आहेत. या वसतिगृहातील सर्व खोल्या वातानुकूलित असून या इमारती च्या तळमजल्यात एकाच वेळी १ हजार विद्यार्थी जेवण करू शकतील एवढ्या मोठ्या डायनिंग हॉलची सोय केली आहे. तसेच अत्याधुनिक जिम्नॅशिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धकांच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक साहित्याची विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. संपूर्ण जिम्नॅशिअम बिल्डिंग ही वातानुकूलित असून योग सेन्टर आणि स्टीम बाथसारख्या सुविधाही यामध्ये आहेत. एकाच वेळी जवळपास १०० विद्यार्थी याचा लाभ घेणार घेऊ शकणार आहेत.

डॉ.पी.व्ही.कडोले म्हणाले,या उत्कृष्ट प्रकारच्या स्थापत्य अभियांत्रिकीचा नमुना असणाऱ्या दोन्ही इमारतीचे उदघाटन तेवढ्याच मोठ्या उंचीच्या माणसाच्या हस्ते व्हावे,असा आग्रह माजी मंत्री आ.जयंत पाटील,श्री.भगतसिंह पाटील यांचा होता. म्हणूनच भारताला रस्ते विकासात अग्रेसर बनवण्यासाठी महत्वाची भूमिका असणाऱ्या आणि भारतीय अभियांत्रिकी कौशल्याची ओळख संपूर्ण जगाला दाखविणारे ना.नितीन गडकरी यांना यासाठी निमंत्रित केले आहे.
हेही वाचा – इस्लामपूर येथे १८ फेब्रुवारीपासून ‘बिझनेस एक्स्पो’
या शैक्षणिक वर्षात अफगाणिस्तान,नेपाळ, साऊथ सुदान, झिम्बाब्वे,बांगलादेश,यु एस ए, आणि आयवोरी पोर्ट या देशातून एकूण ५७ विद्यार्थ्यांनी आरआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. अलीकडेच आरआयटीने अमेरिका,यु के,कॅनडा,ऑस्ट्रेलिया,तैवान आणि जर्मनी या देशातील एकूण ४५ विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. भविष्यात आरआयटीमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. ही गरज लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वस्तीगृह ही वास्तू आरआयटीने उभारली आहे. ना.गडकरी हे विद्यार्थी, पालक,शिक्षक आणि निमंत्रित लोकांशी संवांद साधणार आहेत. या समारंभास परिसरातील सर्व आमदार,खासदार, उद्योजक,शेतकरी,डॉक्टर,वकील, इंजिनीयर्स, पत्रकार,महाविद्यालयाचे प्राचार्य,शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी आणि नागरिकांना निमंत्रित केलेले आहे.
याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य व राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सौ.सारिका पाटील,डॉ.सचिन पाटील, डॉ.कृष्णाजी पाटील व प्राध्यापक उपस्थित होते.

समारंभाची वाहनतळ व्यवस्था
मुख्य कार्यक्रम आरआयटीच्या परिसरात पश्चिमेच्या खुल्या मैदानात होणार आहे. या समारंभास येणाऱ्यांची दुचाकी वाहने लावण्याची व्यवस्था आरआयटीच्या समोर ताटे माळ येथे,तर चारचाकी वाहने लावण्या ची व्यवस्था आरआयटीच्या क्रिकेट मैदानात केली आहे. खास निमंत्रित पाहुण्यांची वाहने कार्यक्रम मैदानात लावली जाणार आहेत. सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































