Last Updated on 28 Sep 2021 9:21 AM by Sanjay Patil/Adhorekhit
आदित्य कुदळे वीर अभिमन्यू,अश्विनी शिंदे जानकी पुरस्काराची मानकरी
मुंबई : भुवनेश्वर येथे बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर झालेल्या ४०व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी मुकुट पटकावला. कुमार संघाने ३२वा तर मुलींनी २३व्या वेळी चषक उंचावला आहे. कुमार संघाने अंतिम फेरीत दिल्लीचा ११-०९ असा धुव्वा उडवला. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा १२-९ असा पराभव केला.

अहमदनगरचा आदित्य कुदळे आणि उस्मानाबादची अश्विनी शिंदे या महाराष्ट्रातील खेळाडूंनी अनुक्रमे वीर अभिमन्यू आणि जानकी पुरस्काराची कमाई केली.
कुमार गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा १९-०८ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या कुमार संघाने एकंदर ३२व्यांदा ही स्पर्धा जिंकली. आदित्य (२.३० मि. आणि पाच गडी), सूरज झोरे (नाबाद ३.४० मि. आणि दोन गडी), किरण वसावे (३.१० मि. आणि १ गडी) आणि विवेक ब्राह्मणे (३ गडी) या चौकडीने महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

कुमारींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूरवर १२-९ अशी मात केली. महाराष्ट्राच्या कुमारींचे हे एकूण २३ वे विजेतेपद ठरले. अश्विनी (३.५०, २.४० मि.), संपदा मोरे (१.३० मि. आणि दोन बळी), दीपाली राठोड (१.१० मि. आणि दोन बळी), वृषाली भोये (दोन बळी) या चौघी महाराष्ट्राच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. दिल्लीचा ऋतिक आणि कोल्हापूरची वैष्णवी यांनी उत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवला. ओदिशाचा पबानी साबर, महाराष्ट्राची वृषाली उत्कृष्ट आक्रमक ठरले.
महाराष्ट्राच्या मुलांनी ३६ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करताना विक्रमी ३२वे विजेतेपद पटकावले. मुलींनी ३६ पैकी ३२ वेळा अंतिम फेरीत पोहोचून २३वे अजिंक्यपद मिळवले. या विजयासह महाराष्ट्राने सलग सातवा दुहेरी मुकुट मिळवला. वैयक्तिक पुरस्कार पटकावण्यात महाराष्ट्राकडून मुलांमध्ये आदित्य कुदळे, मुलींमध्ये अश्विनी शिंदे (उत्कृष्ट अष्टपैलू) तसेच वृशाली भोये यांनी (उत्कृष्ट आक्रमक खेळाडू) बाजी मारली. कोल्हापूरची वैष्णवी पोवार उत्कृष्ट संरक्षक ठरली.
उत्कृष्ट संरक्षक : रितीक (दिल्ली), वैष्णवी पोवार (कोल्हापूर)
उत्कृष्ट आक्रमक : पबानी साबर (ओरिसा), वृशाली भोये (महाराष्ट्र)
उत्कृष्ट अष्टपैलू : आदित्य कुदळे (महाराष्ट्र), अश्विनी शिंदे (महाराष्ट्र)













































































