Last Updated on 22 Apr 2025 4:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । काँग्रेस नेते आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या पदांवर संधी असूनही अनेकदा काँग्रेस पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप करत संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपुर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. संघर्षाच्या काळातही मोठ्या कष्टाने आणि निष्ठेने काँग्रेस वाढविण्याचे काम केले, मात्र त्याचे फळ कधी पदरात पडले नाही. काँग्रेस सोडायची वेळ काँग्रेसनंच आणल्याचं थोपटे यांनी पक्ष यावेळी सांगितलं. जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव असलेले संग्राम थोपटे २००९ पासून २०१९ पर्यंत आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. भोर विधानसभा मतदारसंघात थोपटे घराण्याचं ४० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व राहिलं आहे मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यावेळी संग्राम थोपटे यांचे भाजपमध्ये स्वागत करतानाच काँग्रेस पक्षात तत्व, आचार आणि विचार शिल्लक राहिले नसल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. केवळ चापलुसीचे राजकाराण काँग्रेसमध्ये चालते. मात्र, भाजप तत्वनिष्ठ राजकारण करते, विकासाचे काम करते. थोपटे यांना काँग्रेसमध्ये जितका मानसन्मान मिळाला त्याहून अधिक सन्मान भाजपा करेल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.










































































