Last Updated on 19 Nov 2021 8:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
हुबळी ।
भिकाऱ्यांकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन तुच्छतेचा असला तरी काही भिकारी मात्र आपल्या वेगळेपणामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात.लोकही त्यांना आपलेसे करतात.कर्नाटकातल्या एका गावातला एक भिकारीही असाच आपल्या वेगळेपणामुळे लोकप्रिय बनला होता.त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती.
हा अवलिया भिकारी हुविना हदगली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात बसप्पा ऊर्फ हुच्चा बश्या म्हणून ओळखला जात होता.कन्नड भाषेत हुच्च म्हणजे वेडा. बसप्पा हा मानसिक रुग्ण होता.लहानपणीच त्याला हुविना हदगली बसस्थानकात सोडून देण्यात आले होते.भीक मागत होते त्या हदगली गावातल्या रहिवाशांसाठी बसवा गुडलक होता.बसवा लोकांकडून अवघा एक रुपया भीक घेत होता.
विशेष म्हणजे लोकांनी जास्त पैसे घेण्याचा आग्रह करून देखील तो एक रुपया घेऊन उरलेली रक्कम परत देखील करत! त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो भीक म्हणून फक्त 1 रुपया घेत असे. त्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तो ते घेत नसे. त्यामुळेच तो सर्वांच्या लक्षात राहिला होता.तसेच इथल्या स्थानिकांमध्ये तो लकी चार्म म्हणजे शुभशकुनी असल्याचा विश्वास होता.तो फक्त 1 रुपयाची मागणी करत असे आणि आशीर्वाद देत असे.त्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही.लहानपणापासून तो या गावात राहत असल्यानं स्थानिकांशी त्याचे चांगले नाते जुळले होते.अनेकदा लोक त्याला जेवणही देत असत.
गेल्या आठवड्यात बसवा याचा अपघात झाला.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले. मात्र, उपचारांना यश न आल्यामुळे त्याचं निधन झाले.मात्र त्याच्या अंत्ययात्रेसाठी त्याच्याशी अनोखे नाते जोडले गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती.राजकीय व्यक्तींशी देखील बसवा बिनधास्तपणे संवाद साधायचा,असे देखील सांगितले जाते.आपल्या निरागस, निरपेक्ष वृत्तीने बसप्पाने सगळ्यांना जिंकून घेतले होते.म्हणूनच भिकारी असूनही त्याला लोकांचे इतके प्रेम,सन्मान मिळाला अशी घटना फारच दुर्मीळ असते.











































































