Last Updated on 25 Dec 2021 7:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्यात ओमिक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.मंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे.त्यानुसार राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.
राज्यात पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
जगात ११० देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे नियमावलीत?
रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी असेल.
बंदिस्त सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसावी; खुल्या जागेत ही लग्न समारंभासाठी संख्या 250 च्या वर नसावी किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते
इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसावी किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसावी.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.










































































