Last Updated on 24 Nov 2021 9:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर हजर राहावे, अन्यथा कारवाई करणार – अनिल परब
कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या निर्णय जाहीर करु; खोत-पडळकरांची माहिती
मुंबई ।
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मोठी घोषणा केली आहे.तरी आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.त्यामुळे जिंकू किंवा मरू पण आमचं या प्रशासनासोबत युद्ध चालूच राहणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेले संपकरी मात्र पगारवाढीवर खुश नसल्याचे समजते.आमची विलिनीकरण हीच प्रमुख मागणी असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आमचा संप आम्ही सुरूच ठेवू असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले त्यानंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानात पोहोचले,मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती.त्यामुळे संपाबाबत उद्या निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी दिली.संपावर आजही तोडगा न निघाल्यामुळे सर्वसामान्यांना लालपरीचा प्रवास कधी मिळणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
संपकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणार: सदाभाऊ खोत

आंदोलक कर्मचाऱ्यांची आजची रात्रही आझाद मैदानात जाणार आहे. संपाबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.कर्मचाऱ्यांसोबतही आम्ही चर्चा करतो.त्यांना हा पर्याय मान्य आहे का हे पाहिले जाईल.संप रबरासारखा ताणला तर तुटतो त्यामुळे सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे.सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज चर्चा करणार आणि उद्या यावर भूमिका स्पष्ट करणार असे आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.
कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर हजर राहावे, अन्यथा कारवाई करणार – अनिल परब

शासन आर्थिक अडचणीत असतांना ही आम्ही पगारवाढीची तयारी दाखवली आहे. आम्ही दोन पाऊले पुढे आलो आता एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पाऊले पुढे यावे आता मार्ग निघाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांनी तात्काळ कामावर हजर व्हावे, ज्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस आली आहे त्यांनी देखील कामावर हजर व्हावे, हे कर्मचारी कामावर हजर झाल्यावर लगेच त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात येईल तसेच जे कर्मचारी हजर होणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
एसटी चे यापुढील अधिक नुकसान सरकारला ही परवडणार नाही आणि कामगारांना ही परवडणार नाही, शिवाय एवढी पगारवाढ करुन देखील जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर शासन म्हणून जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ असही ते यावेळी म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी एसटी महामंडळाने दरमहा ६० कोटीची तूट आणि वर्षाला एकूण ७२० कोटींचा बोझा राज्य सरकारवर येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामावर हजर व्हावे असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. एसटीचे यापुढील अधिक नुकसान सरकारला ही परवडणार नाही आणि कामगारांना ही परवडणार नाही, शिवाय एवढी पगारवाढ करुन देखील जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर शासन म्हणून जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ असेही ते यावेळी म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारच्या घोषणेचा ठिकठिकाणी निषेध
दरम्यान,कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याकडून राज्य सरकारच्या घोषणेचा निषेध परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेले वाढीव वेतन आम्हाला मान्य नसल्याचे सांगण्यात आले. कोल्हापुरातील राज्य सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांना मागण्या मान्य नसल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत आहेत.मुंबई, पुणे, नाशिकसह काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.














































































