Last Updated on 23 Nov 2021 10:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सरकारमध्ये विलीनीकरण हा मुद्दा कर्मचाऱ्यांनी लावून धरल्याने सरकारची कोंडी
मुंबई ।
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची आणि आमदार सदाभाऊ खोत,आमदार गोपीचंद पडळकर,पर्यावरण मंत्री अनिल परब यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.या बैठकीत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याचा पर्याय राज्य सरकारकडून देण्यात आला.तर सरकारच्या या प्रस्तावाबाबत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पडळकर आणि खोत यांनी सांगितले.उद्या सकाळी पुन्हा बैठक घेऊन त्यावर चर्चा केली जणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसची कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या आंदोलानाचे नेतृत्त्व भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपिचंद पडळकर करत आहेत.तर आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसह ठाण मांडून आहेत.दरम्यान,एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे.या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे.समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
संप मिटण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे.संप लांबतोय त्यामुळे कर्मचारी तसेच एसटी महामंडळाला तोटा होत आहे.शाळकरी मुलांना अडचणी येत आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा,अशी विनंतीही अनिल परब यांनी केली.
निलंबित कर्मचाऱ्यांशीही चर्चा करु- खोत
दरम्यान,अनेक एसटी कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या.अनेकांचे निलंबन करण्यात आले.तर निलंबन झालेले जवळपास 100 टक्के कर्मचारी उद्या आझाद मैदानावर पोहोचणार आहेत.उद्या त्यांच्याशी चर्चा करु.त्यांचे म्हणणे घेऊ, उद्यापर्यंत आम्ही सरकारच्या भूमिकेबाबत कामगारांशी चर्चा करुन,मग पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.
विलीनीकरणावर आम्ही ठाम- पडळकर
सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तसेच विलीनीकरणावर आम्ही ठाम आहोत, असेही ते म्हणाले. पगारवाढ आणि वेळेवर पगार यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय निर्णय नाही. आज-उद्यामध्ये त्यांच्याशी बोलून निर्णय सांगू, असे पडळकर यांनी सांगितले.
विलीनीकरण शक्य नसेल तर…शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला
दरम्यान,त्याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चा झाली असून पवार यांनी याबाबत तोडगा सुचविला आहे. जर एस टी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करता येणे शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांची पगारवाढ करा, त्यासाठी तरतूद करा, अशी सूचना पवार यांनी केली आहे.
दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यातही बैठक झाली आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात एसटी कर्मचारी संपाचाही मुद्दा होता, अशी माहिती राऊतांनी दिली.
सरकारमध्ये विलीनीकरण हा मुद्दा कर्मचाऱ्यांनी लावून धरल्याने सरकारची कोंडी
दरम्यान,एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याने राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे.या आंदोलनात भाजपचे अनेक नेते सहभागी झाल्याने त्याला राजकीय स्वरुपही आले आहे.एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण हा एकच मुद्दा कर्मचाऱ्यांनी लावून धरल्याने सरकारची कोंडी झाली आहे.














































































