Last Updated on 27 Jan 2025 7:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
२५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता
मुंबई । स्वस्त दरात लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवासी नेहमीच एसटी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळांच्या ताफ्यात स्वमालकीच्या 25 हजार नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यानुसार, दरवर्षाला 5 हजार बसेस एसटी महामंडळाकडून खरेदी केली जाणार आहे. असं दरवर्षी 5 हजार बस प्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस खरेदी केली जाणार आहे. स्वमालकीच्या बसेस खरेदी करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आज अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावाला अजित पवारांकडून मान्यता देण्यात आली आहे.
एसटी महामंडळ दरवर्षी 5 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदी करणार आहे. दरवर्ष येत्या 5 वर्षात 25 हजार नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. तसेच, हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन 2025-26 अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. या बैठकीमध्ये एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थितीबाबत मंत्री सरनाईक यांनी माहिती दिली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील.
या पार्श्वभूमीवर भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वत:च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी 5 हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच, ही मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्य करण्यात आली. दरवर्षी 5 हजार नवीन बसेस त्यानुसार, २०२९ वर्षापर्यंत 25 हजार बसेस व 5 हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे 30 हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल. तसेच, भविष्यात ‘गाव तिथे एसटी…मागेल त्याला बस फेरी…’ असे आपण देऊ शकतो, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.










































































