Last Updated on 19 Jul 2020 3:54 AM by
नागपूर : नागपुरात तब्बल दहा वर्षे नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी असे अनेक पदे भूषविणाऱ्या एका सच्चा सेवकाला आयुष्याच्या संध्याकाळी हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.देवराव तिजारे असे या सच्चा सेवकाचे नाव आहे. राजकारणात प्रामाणिकपणे जणसेवा करणारे देवराव आज वयाच्या ७२ व्या वर्षी जिथे ट्रस्टी होते.म्हणजेच नागपूर सुधार प्रन्यास येथे चौकीदार आहेत.
कितीही मोठा नेता असू द्या. त्याच्या राजकीय प्रवासाची पहिली पायरी म्हणजे नगरसेवक हे पद. आणि याच पदावरून गडगंज संपत्ती जमा करून राजकारणात उंचीवर जाणारे हजारो लोकप्रतिनिधी आपण आजवर पाहिले. मात्र, नागपूरचे देवराव तिजारे राजकारणातून पैसा आणि पैसातून पुन्हा राजकारण या समीकरणाला अपवाद ठरलेले राजकारणी.१० वर्षे नागपूर महापालिकेचे नगरसेवक.एक वेळ स्थायी समितीचे अध्यक्ष.
नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी असलेले देवराव तिजारे आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत.याचे कारण म्हणजे देवराव यांनी खऱ्या अर्थाने फक्त समाजासाठी, लोकांसाठी राजकारण केले.अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना फक्त लोकांची कामे करणाऱ्या देवराव यांनी कधीच स्वतःसाठी काहीच मिळविले नाही.राजकारण लोकांसाठीच असते,फक्त सध्या राजकारण्यांनी त्याची व्याख्या स्वतःच्या स्वार्थासाठी बदलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एकेकाळी शरद पवार, दत्ता मेघे,सतीश चतुर्वेदी,श्रीकांत जिचकार अशा महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेत्यांसोबत काम करणारे देवराव आज एका छोट्याशा प्लॉटवर बांधलेल्या दोन खोल्यांच्या घरात राहातात. कर्ज काढून बनवलेल्या या घरावर रंगरंगोटी करायला ही आज देवराव यांच्याकडे पैसे नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे.
सच्चा लोकसेवक असलेले देवराव तिजारे चौकीदार म्हणून काम करताना त्यांना वाईट वाटत नाही.पण, ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं तेच पक्ष आणि सोबतचे नेते उंचीवर जाऊन मला विसरले, याची खंत वाटत असल्याची त्यांची भावना देवराव यांनी बोलून दाखवली आहे.













































































