Last Updated on 26 Dec 2021 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सिंधुदुर्ग |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी.राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

आज ओरोस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तृप्ती मुळीक या पोलिस कॉन्स्टेबल असून त्या कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या आहेत. मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. मुळीक यांनी सारथ्य केलेल्या गाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे होते.
सतेज पाटील यांच्याकडून कौतुक
आज व्हीआयपी वाहनचा चालक म्हणून त्यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता.याचदिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्याची संधी तृप्ती यांना मिळाली.त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य बघून अजित पवार आणि उदय सामंतांनी कौतुक केलं. तसेच सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तृप्ती यांचे कौतुक केले आहे.














































































