Last Updated on 28 Nov 2025 11:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर । येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संवाद शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आजच्या शिबिराची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. काशिलिंग गावडे यांनी केले. महा. अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आणि संघटनेचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले.
संजय बनसोडे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही समाज विवेकी बनविण्यासाठी आहे. समाजातील अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. आपली विचारशक्ती गमावल्यामुळे माणूस अंधश्रद्ध बनतो. अंधश्रद्धा या माणसाच्या विकासाच्या आड येतात.
अंनिस चे राज्य उपाध्यक्ष प्रा.शामराव पाटील म्हणाले, विवेकी जीवन पद्धतीने माणूस आनंदी आणि सुखी राहू शकतो. अंधश्रद्धा मुक्त माणूस हाच खऱ्या अर्थाने आधुनिक माणूस होय. संत आणि समाज सुधारकांचा कालसुसंगत विचार जपला पाहिजे.
भास्कर सदाकळे यांनी चमत्कार सादरीकरण करून विनोदी पद्धतीने बुवाबाजी आसूड ओढले. पत्रकार दिलीप क्षीरसागर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नकला सादर करून प्रबोधन केले. प्रा. डॉ.राम घुले यांनी बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीच्या चित्रफिती दाखवून त्यांच्या फसवणुकीच्या पद्धती समजावून सांगितल्या. प्राचार्य डॉ.नितीन शिंदे यांनी फलज्योतिष, पत्रिका जुळविण्याच्या अंधश्रद्धेबद्दल प्रबोधन केले. प्रा. विजयकुमार जोखे, डॉ. सुदाम माने, प्रा. रणजित चव्हाण, प्रा. बी.आर.जाधव यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्रा. के.बी.पाटील, प्रा.दीपक स्वामी, संजय कुरणे, प्रशांत इंगळे, अमर पाटील, भूषण जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन आरती सावंत, अमृत काळे, अरबाज पटेल, युवराज कापसे, प्रकाश बुरुटे यांनी केले.













































































