Last Updated on 10 Nov 2020 4:05 PM by
सध्या थंडीची चाहूल लागत आहे. थंडीचा एखादा झोत अंगावरून गेला की आपले शरीर थरथरते आणि काही तरी गरम गरम हवेसे वाटायला लागते. परंतु गरम कपड्यांनी फार काही साध्य होत नाही. शेवटी गरम कपडे हा बाहेरून केलेला उपचार असतो. मुळातूनच शरीरातली गर्मी वाढवली तर मात्र थंडीचा फारसा त्रास होत नाही. कडाक्याच्या थंडीत धाडसाने व्यायाम करायला सुरूवात करावी. थोड्या दंड बैठका काढाव्यात किंवा २०० ते ३०० मीटर पळावे. बघा शरीरात कशी गर्मी येते. एवढे पळून आलात की अंगावरचे गरम कपडेसुध्दा काढून टाकावेसे वाटतात.
अशा प्रकारच्या थंडीचा एक उपाय म्हणून डॉक्टर मंडळी सायकलिंगचा उपाय सांगतात. संध्याकाळ झाली आणि रस्त्यावरील गर्दी थोडी कमी झाली की घराबाहेर सायकल काढावी आणि थोडे मेन रोडच्या आत लहान गल्लीमध्ये हळूच सायकल चालवावी. फार वेगाने नव्हे. पण मध्यम वेगाने १५ मिनिटे जरी सायकल चालवली तरी आपल्याला शरीरातून गरम हवा वाहत असल्याचा अनुभव येईल आणि गरम कपड्यांची गरजच भासणार नाही.
डॉक्टर मंडळी आणखीन एक सोपा उपाय सांगतात. तो म्हणजे थंडी वाजायला लागली की स्वयंपाक घरात जावे आणि आपल्या हाताने चहा, कॉफी असे एखादे गरम पेय तयार करून ते प्यावे. त्याच्या प्राशनाने तर थंडी जाईलच पण ते तयार करताना आपल्याला शेगडीचे जे सान्निध्य लाभेल त्यामुळेही थंडी थोड्या प्रमाणात का होईना पळून जाईल.
आला हिवाळा, नियम पाळा

हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी सुरू होतात. काही लोकांना थंडी बाधते आणि त्यांना सर्दी होते. मात्र हिवाळ्यात होणारी ही सर्दी आणि हिवाळ्यात होणार्या प्रदूषणामुळे होणारा ऍलर्जीचा त्रास यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. ते ध्यानात घेण्याची गरज आहे. एरवी ऍलजीमुळे सर्दी होणार्या लोकांना ती हिवाळ्यात जास्त होण्याची शक्यता असते. सर्दीमध्ये नाक वाहते आणि सतत त्रास होत राहतो. परंतु सर्दीचा त्रास काही दिवसात बरा होतो. तो जास्तीत जास्त दहा दिवस राहतो. ऍलर्जीचा त्रास काही आठवडे किंवा कधी कधी दोन तीन महिनेही जारी राहतो
ऍलर्जीचा त्रास फार दिवस होण्याचे कारण म्हणजे तो त्रास केवळ थंडीमुळे झालेला नसतो तर तो हवेतल्या प्रदूषणामुळे झालेला असतो. अशा लोकांनी इन्हेलर जरूर वापरला पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांनी शिफारस केलेले स्प्रे आवर्जुन वापरले पाहिजेत. अशा प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होऊच नये यासाठी घर धुळीपासून मुक्त ठेवले पाहिजे. घरातले कारपेटस् आणि गादीवरील चादरी आठवड्यातून एकदा तरी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ केल्या पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांनी धूम्रपान टाळले पाहिजे.









































































