Last Updated on 06 Nov 2025 4:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील अवकाळी पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळातील आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी सामाजिक जबाबदारी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वतःच्या स्तरावर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३ लाख ३ हजार इतकी रक्कम जमा करून ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्द केली.
मागील काही महिन्यांपासून राज्यात अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे, जनावरांच्या चाऱ्याचे तसेच घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बोईसरचे आमदार विलास तरे यांचे स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार सर्व स्वीय सहाय्यकांनी सामाजिक भान जपत एकत्रितपणे सुमारे ३ लाख ३ हजार रुपयांचा निधी संकलित केला.
त्यानुसार मंगळवारी वा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्व करण्यात आला. या वेळी सरकारी यंत्रणेत कार्यरत तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःहून पुढे येणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे. हा उपक्रम इतर घटकांसाठीही आदर्श ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीय सहाय्यकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.














































































