Last Updated on 20 Sep 2021 5:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्थानिक क्रिकेटपटूंसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फी अर्थात सामन्यानंतर मिळणारी रक्कम वाढवण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 40 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यांच्या मॅच फीमध्ये 60 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
23 वर्षाखालील खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 वर्षाखालील खेळाडूंना 20,000 रुपये इतकी रक्कम बोर्ड मॅच फी म्हणून देणार आहे.
2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे.
जय शाह यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मला स्थानिक क्रिकेटपटूंच्या सामन्यानंतर मिळणाऱ्या रकमेत वाढ झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. वरिष्ठ – 60,000 रुपये (40 ,सामन्यांहून अधिक), 23 वर्षाखालील- 25,000 रुपये, 19 वर्षाखालील- 20,000 रुपये.’














































































