Last Updated on 20 Nov 2021 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हैदराबाद |
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 लोक बेपत्ता आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे जुनी 3 मजली इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. येथे बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही चारहून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून संततधार पावसाने कहर केला आहे. रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि एका दक्षिण किनारपट्टीच्या जिल्ह्यात २० सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहनची बस रामापुरममध्ये अडकली, त्यामुळे १२ जणांना जीव गमवावा लागला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरात किमान तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.









































































