Last Updated on 18 May 2020 12:17 PM by
यंदा खायचा असेल हापूस आंबा तर कोरोना जाईपर्यंत घरातच थांबा” म्हणत सर्वांनी वाट बघितली, परंतु कोरोना काय गेला नाही आणि यंदा काय आपल्याला हापूस आंबा खायला मिळत नाही असा विचार करत लोक बसले. आता लोकडाऊनचे नियम अल्पशः शिथिल झाल्याने बाजारात भाजीपाल्यासोबतच आंबेही दिसू लागले आहेत.
आवक कमी असल्याने आंब्यांचे दरही चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहे. मात्र हापूसप्रेमी मंडळी पैशांचा विचार न करता हापूस खरेदी करत आहेत. अशामध्ये हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबे खपवण्याचे प्रकारही महाराष्ट्रात घडायला लागले आहेत. मग अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अस्सल देवगड किंवा रत्नागिरी हापूस ओळखायचा असेल तर त्यासाठी ही माहिती वाचा…
अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा ?
१) आकार : आंब्याच्या आकारावरून हापूस ओळखता येतो. देवगड हापूसचा आकार कोयरीसारखा असतो. देठ आखूड आणि खालून तो निमुळता असतो. देवगड हापूसची साल पातळ असते आणि साल सहज निघते. हापूसच्या सालीसोबत आतला गर निघत नाही. पिकल्यावर हा आंबा थोडा सुरकुतला जातो. २) सुगंध : हापूसच्या देठाचा वास घेऊन तो ओळखता येतो. बाकीच्या आंब्यांच्या तुलनेत हापूसच्या देठाला मस्त असा सुगंध येतो.
३) रंग : सर्वसाधारणपणे हापूस आंब्याचा रंग पिवळसर केशरी असतो. त्यातल्या त्यात देवगड हापूस देठाच्या बाजूने केशरी असतो आणि जसजसा तो परिपक्व होतो तसतसा तो अधिक केशरी बनत जातो.
४) चव : हापूस खाल्ल्यानंतर थोडासा जीभ थोडीशी चुरचुरते. हापूसमध्ये कोय जास्त मोठी नसते आणि आतमध्ये लहान रेषा असतात. परंतु फोडी सोबत रेषा निघत नाहीत. हापूसला गर जास्त असतो. रत्नागिरी हापूसची कोय मोठी आणि गर थोडा कमी असतो. हापूसच्या चवीला अवीट असा गोडवा असतो.














































































