Last Updated on 15 Oct 2023 8:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
वाळवा – शिराळा तालुक्यातील चित्र : कर्मचाऱ्यांची मनमानी, वेळकाढूपणाचे धोरण
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । वाळवा – शिराळा तालुक्यातील काही तलाठी व ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.त्याचबरोबर अन्य कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असे चित्र दिसून येते.हे कर्मचारी आठवड्यातील काही दिवसच प्रत्यक्ष कामावर हजर असतात.त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते.हे कर्मचारी प्रत्यक्ष टेबलवर फारच कमी तर इतर ठिकाणीच आपला वेळ घालवित असतात.
तहसील पंचायत समिती,तालुका कृषी,भूमी अभिलेख,दुय्यम निबंधक,पाटबंधारे आदी कार्यालयात तालुक्यातून अनेक नागरिक कामासाठी येत असतात.परंतु ज्या टेबलवर काम असते त्या टेबलवरील काही अधिकारी व कर्मचारी अनेकवेळा वेळी गायबच असतात.त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसूनही त्या कर्मचाऱ्यांचे दर्शन होत नाही.काहीतरी कामाचे निमित्त सांगून अनेक शासकीय कर्मचारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असतात.अनेकवेळा कर्मचाऱ्यांकडून कामाबाबत नीटशी माहिती दिली जात नाही.काही कर्मचारी तर पक्षकारांकडे बघून न बघितल्यासारखे करतात.
शासकीय कार्यालयातून कर्मचाऱ्यांच्यासाठी हालचाल रजिस्टरही गायब आहेत.तसेच अण्णासाहेबांच्या हालचाल रजिस्टरचा पत्ताच नसतो.कार्यालयाचेच काम असल्याचे सांगून अनेक कर्मचारी आपला बराचसा वेळ ऑफिसबाहेरच घालवत असतात.शिवाय चहा-पान,मित्र मंडळींच्यात गप्पा- टप्पा अशातही या कर्मचाऱ्यांचा दिवसातील बराचवेळ खर्च होत असतो.
आपल्याकडे कामासाठी आलेल्या नागरिकांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून हे कर्मचारी त्यांना ताटकळत ठेवत असतात.अनेक शासकीय कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत कार्यालयात हजर आहेत तोपर्यंत कर्मचारी प्रामाणिकपणे काम केल्याचे भासवितात.परंतु जेव्हा वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर जातात त्यावेळी मात्र हे कर्मचारी आपले आहे ते टेबल सोडून इतर ठिकाणीच वेळ घालवित असतात.तसेच तालुक्यातील काही गावातील तलाठी आणि व ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी आहेत. अशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
रात्रीस खेळ चाले…
काही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.हे कर्मचारी फक्त कागद रंगविण्याचे कामच करीत असतात.त्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.दरम्यान, ‘दाम दिले तरच काम’ असा काही कर्मचाऱ्यांचा खाक्या असल्याची चर्चा आहे.काहींनी तर त्यासाठी दलाल नेमल्याची चर्चा आहे.हे कथित दलाल ‘ऑफिस अवर’ झाल्यानंतर कार्यालयात प्रकट होतात म्हणे! सायंकाळी सहा नंतर ‘लेनदेन’ पूर्ण केली जाते अशी चर्चा शासकीय वर्तुळातच सुरु आहे.अपेक्षित ‘दक्षिणा’ मिळाल्यानंतर संगणकाच्या पेठाऱ्यातील ‘त्या’ कागदाची ‘प्रिंटर’वर प्रिंट निघून ती अलगदपणे कथित दलालाच्या हातात जाऊन स्थिरावते अशी चर्चा खुलेआमपणे सुरु आहे.रात्रीस खेळ चाले…असा सारा मामला चर्चेत आहे.
‘दक्षिणारूपी वाटेला ‘सीमा’ च नाही…
कथित आणि चर्चेतील दलालांकडून जाणारी ‘दक्षिणा’ कार्यालयात पोहचते अशी चर्चा आहे.’बॉस’ लोकांची लेनदेन चालते.मग ‘आम्ही मागे कसे’ या हिशोबाने कनिष्ठ कर्मचाऱ्यांचीही ‘हातसफाई’ सुरु असल्याची चर्चा आहे.त्यामुळे दक्षिणारूपी वाटेला ‘सीमा’च राहिलेली नाही अशीही चर्चा आहे.
काही तर नेहमीच ‘लेटलतीफ’
काही कर्मचारी तर नेहमी ‘लेटलतीफ’ असतात.अशा सरकारी बाबूंना दणका देण्याची गरज आहे.एकंदरीत वाळवा – शिराळा तालुक्यातील शासकीय कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय…कुत्रं पीठ खातंय असाच आहे.हा सारा सुरु असलेला प्रकार म्हणजे एकतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर ‘वचक’ नाही.नाहीतर अधिकाऱ्यांचेच त्या कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठबळ असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल.
![]()










































































