Last Updated on 10 Dec 2025 10:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी धुळगावाने शिक्षणासाठी उभारलेला ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज धुळगाव भेटीदरम्यान केली. गेली तीन वर्षे सातत्याने आणि शिस्तबद्ध रितीने राबविण्यात येत असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. “प्रत्येक गावाने अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पहाटे ५ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ९ हा वेळ विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाची घंटा’ म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या वेळेत संपूर्ण गावभर सायरन (भोंगा) वाजवला जातो आणि ग्रामस्थ स्वतःहून घरातील टीव्ही, मोबाईलसह सर्व मनोरंजनाचे साधन बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरण उपलब्ध करून देतात.
या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमितता, शिस्तबद्धता आणि अध्ययनाची सवय विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल घडताना दिसत असून, “या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे केंद्रित वातावरण निर्माण होईल, त्याचा नक्कीच मोठा फायदा होईल,” असा विश्वास जिल्हाधिकारी काकडे यांनी व्यक्त केला.
कोविड-१९ काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मोबाईलच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. व्यापक जनजागृतीनंतर गावकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सकाळ-सायंकाळ निश्चित दोन तास शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कुटुंबीयांमधील संवाद वाढण्यासही या उपक्रमाने हातभार लावला आहे.

या पाहणीदरम्यान मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्चना कापसे, सरपंच शिवदास भोसले, उपसरपंच भारती चौगुले, मुख्याध्यापक गोपाळ कनप, ग्रामविकास अधिकारी अंकुश डवणे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट करण्यासाठी ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय कायम राहावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गावातील काही भागात घरोघरी भेट देऊन मुलांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्हीडिओ कॉलव्दारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अग्रण धुळगाव गावातील आजी व माजी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावला आहे. गावातील प्रत्येक शिक्षकांनीही 30 ते 40 घरे वाटून घेतली आहेत. ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवितात. शैक्षणिक पर्यटन असलेले हे पहिले गाव पाहिले आहे. सर्वांनी या गावास भेट देऊन त्याची सत्यता पहावी असे सांगून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, आजी व माजी सैनिक या सर्वांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.










































































