Last Updated on 15 Nov 2023 12:06 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आणि काही दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस यामुळे साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.त्यामुळे गळीत हंगाम सुरू होवून काही दिवस उलटले तरी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी सुरू झालेली नाही.काही कारखान्यांमध्ये ऊस तोडणी व गाळप सुरू असले तरी अद्याप गती नाही.ऊस गाळपाची चाके मंदावली आहेत.
सांगली,कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले ऊसदर आंदोलन चिघळले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली आहे.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली जात आहे.तर काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या जात आहेत.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालपासून अनेक ठिकाणी ऊसाने भरलेली वाहने रोखून धरली आहेत.मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर मिळावा यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून संघटनेने सोमवारपासून अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
ऊसदर आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात ऊस तोडणीची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.दराचा तोडगा न निघाल्याने काही भागातील ऊस तोडणी बंद आहे.काही ठिकाणी तोडणी कामगार बसून आहेत.ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.तर मध्यंतरी पावसाने झोडपले त्यामुळे कारखान्यांची ऊस तोडणी खोळंबली होती.त्यामुळे हंगामाची सुरुवात अडखळतच झाली आहे.
हंगाम सुरू होऊन बारा ते तेरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अनेक कारखान्याचे गाळप काही हजार टनही झालेले नाही.ऊस तोडणीला स्वाभिमानीकडून विरोध होत असल्याने शेतकरीही धास्तावले आहेत.कारखान्याकडे निघालेला ऊस अडवून उसाचे नुकसान होत असल्याने काही कारखानदारांनी तोडणी थांबण्याची भूमिका घेतली आहे.














































































