Last Updated on 07 Jul 2025 2:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१५ एप्रिल २०२५ पासून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक अनिवार्य
सांगली । राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद व प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक (Agristack) योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेला मान्यता दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या डिजिटल यंत्रणेशी थेट जोडणारी आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारी ‘ॲग्रिस्टॅक’ योजना प्रत्यक्षात आली असली, तरी वाळवा तालुक्यातील अनेक शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. यामुळे पीएम किसान योजना, पीक विमा योजना, दुष्काळी अनुदान, शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हा क्रमांक घेतलेला नाही त्यांनी तातडीने नजीकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा किंवा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh या संकेतस्थळावर स्वतः जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
काय करावे?
▪️ नजीकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधा.
▪️ किंवा स्वतः खालील संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
👉 https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh












































































