Last Updated on 04 Apr 2025 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसूल नाले व बंधाऱ्यातून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड मोफत मिळणार आहे. यामुळे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम, दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होईल. शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांना शेततळे, विहीर बांधण्याकरिता तसेच शेत पाणंद रस्त्यांसाठी माती आणि खडी ‘रॉयल्टी फ्री’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय ३ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांना आपल्या शेतात जाण्यासाठी व कृषी यंत्र सामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे यासाठी चांगले पाणंद रस्ते आवश्यक आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाणंद रस्त्याची अवस्था खराब असून शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारच्या महसूल विभागाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हेही वाचा – मोठा निर्णय! नव्या बांधकामांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
या योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसूल नाले व बंधाऱ्यातून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड मोफत मिळणार आहे. यामुळे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम, दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होईल.
शेतीसाठीची यंत्रसामग्री, शेतमालाची वाहतूक यामुळे अधिक सोयीची होईल. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची कार्यक्षमता वाढेल, उत्पन्न वाढेल व खराब पाणंद रस्त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणींपासून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता होणार आहे.












































































