Last Updated on 05 Dec 2024 10:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निकषाबाहेरील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल
मुंबई । एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली होती. ही योजना यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘लाडकी बहीण योजना’ सुरु ठेवणार आहोत आणि २१०० रुपयेही देणार आहोत. जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आहोत. निकषाबाहेरील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल. मात्र, त्याबाबतचा निर्णय लवकर घेतला जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या पहिलाय बैठकीत पुण्यातील एका रुग्णाला उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर…
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. आम्ही २१०० रुपयेदेखील देणार आहोत. बजेटच्यावेळी त्याचा आम्ही विचार करु. आर्थिक रिसोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. ते करण्याचा आमचा निर्णय पक्का आहे. दिलेली सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण करु. त्यासाठी करायच्या व्यवस्था आम्ही आधी करु,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल. शेतकरी सन्मान योजना जेव्हा पंतप्रधान मोदींनी सुरु केली तेव्हा पहिल्या टप्प्यात असं कळलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनाही ते मिळालं आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.












































































