Last Updated on 05 Nov 2023 7:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : राज्यातील ४४ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. भाजप नेते सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल तसेच पंकजा मुंडे यांच्याही साखर कारखान्याचा या काळ्या यादीमधील कारखान्यांमध्ये समावेश आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे ४४ कारखाने शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे साखर आयुक्तांनी म्हटले आहे.
चालू गळीत हंगामात कारखान्यांनी नियमित ऊसदर देणे. तसेच उशीर झाल्यास ऊसाची रक्कम देणे,वेळेत ऊसदर न दिल्यामुळे कारखान्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या आधारे चांगला, मध्यम आणि वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वरील निकषांच्या आधारे राज्यातील 44 साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकले आहे.
गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे.
राज्यात सर्वाधिक ३० कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माढा येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, विठ्ठल कार्पोरेशन कारखाना(खासगी), बबनराव शिंदे साखर कारखाना (खासगी), विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (खासगी) एवढेच कारखाने शेतकऱ्यांना नियमित देणी देत असून १४ कारखान्यांवर देणी थकविल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.
त्याचप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडेंशीसंबंधित वैद्यनाथ कारखान्याचाही (परळी) या यादीमध्ये समावेश आहे. तसेच जय भवानी गेवराई कारखान्याचाही या यादीमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातील किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज, लोहारामधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना त्याचप्रमाणे मंगरुळमधील कांचेश्वर शुगरचाही या काळ्या यादीतील कारखान्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सांगली एसजीझेड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट, पैठणमधील शरद कारखाना, लातूरमधील पन्नगेश्वर शुगर, औसामधील श्री. साईबाबा शुगर आणि नंदुरबारमधील सातपुडा तापीचाही या यादीमध्ये समावेश आहे.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी, संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा यांच्यासह लोकमंगल, सोलापूर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, मकाई सहकारी साखर कारखाना करमाळा, लोकमंगल ऍग्रो, बीबी दारफळ, लोकमंगल शुगर भंडारकवठे, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे, गोकुळ शुगर धोत्री, मातोश्री लक्ष्मी शुगर सोलापूर, जयहिंद शुगर आचेगाव, विठ्ठल रिफाइन्ड शुगर पांडे, करमाळा, गोकुळ माउली शुगर तडवळ – अक्कलकोट, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, मोहोळ, वैदयनाथ सहकारी साखर कारखाना परळी वैजनाथ, एच जे शुगर रावळगाव या कारखान्यांना लाल यादीत टाकण्यात आले आहे. यातील बहुतेक सर्व कारखाने बड्या पुढाऱ्यांच्या हातातील असून यात सुभाष देशमुख (सोलापूर) यांचे तीन कारखाने आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, समाधान आवताडे यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांनाही यात फटका बसलेला आहे.
शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम वेळेवर न देणे, ऊसाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक करणे असा ठपका या कारखान्यांवर ठेवण्यात आला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांना ऊस घालताना ही यादी लक्षात ठेवावी असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलं आहे. स्थानिक राजकारणाचे केंद्रस्थान असलेल्या कारखान्यांना ही मोठी चपराक बसली आहे.












































































