Last Updated on 21 Aug 2024 11:57 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.नुकताच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या सीएससी 2.0 योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, सदर आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापन, सनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील १० तालुक्यामधील १५ महाविद्यालयांत प्रायोगिक तत्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
शासनाचा सदर निर्णय हा राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला असून, अशा प्रकारे महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत राज्यातील इतर ठिकाणांवरुनही मागणी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव, सदर निर्णय राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबतची मागणी करण्यात येईल, त्या त्या महाविद्यालयांना शासन निर्णयातील तरतूदीस अनुसरुन आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजूरी देतांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सदरील कार्यवाही करतांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या. (महाआयटी), मुंबई यांचेशी तांत्रिक सहाय्याकरीता समन्वय साधावा असे राज्य शासनाने जरी केलेल्या आदेशात म्हटले आहे.














































































