Last Updated on 16 Mar 2024 10:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात १५ मार्च २०२४ पर्यंत, ९ कोटी २० लाख, ३१ हजार ७० मतदार नोंदले गेले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकांबाबत माहिती देण्यासाठी आज मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक ६, मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेतले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पहिल्या टप्प्यातल्या ५ लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० मार्चपासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यातल्या ८ लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ मार्चपासून सुरु होईल.तिसऱ्या टप्प्यातल्या ११ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिलपासून सुरु होईल.
चौथ्या टप्प्यातल्या ११ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरु होईल. तर पाचव्या टप्प्यातल्या १३ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरु होईल. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ मार्चपासून सुरु होईल.













































































