Last Updated on 24 Nov 2024 9:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश
निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा
मुंबई । महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी काल शनिवार रोजी पूर्ण झाली. या निकालात महायुतीला तब्बल २३० जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर विजय मिळू शकला. भाजपला एकूण मतदानाच्या २६.७७ टक्के मतदान तर काँग्रेसला १२.४२ टक्के इतकं मतदान झालं.
महायुतीच्या २३० जागांमध्ये भाजपला १३२, शिवसेनेला ५७, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस १६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २० आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या. विदर्भात महायुतीला ४८ जागा मिळाल्या. यामध्ये गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी चार जागांचा समावेश आहे.
गडचिरोलीतील तीन मतदारसंघांपैकी दोन, भंडारा जिल्ह्यातील तीन पैकी दोन, चंद्रपूर मधील सहापैकी पाच मतदारसंघात तर नागपूर जिल्ह्यातील बारा पैकी नऊ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. अकोला जिल्ह्यातील पाच पैकी तीन मतदारसंघात, बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदार संघात, यवतमाळ येथील सात पैकी पाच, अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी सहा तर वाशिम जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीला केवळ १२ जागा विदर्भात मिळाल्या आहेत. चंद्रपुरातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विजयी झाले तर साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अखेरच्या फेरीत अवघ्या २०८ मतांनी निसटता विजय झाला. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या २६.७७ टक्के मतदान भाजपला झालेलं आहे.
हेही वाचा – यंदा विधानसभेत भाऊ, बहीण, सासरे-जावयासह सर्वांत तरुण आमदार करणार प्रवेश
मतदानाच्या टक्केवारीत काँग्रेसला १२.४२ टक्के मतदान झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ९.०१ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ११.२८ टक्के शिवसेनेला १२.२८ टक्के तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ९,९६ टक्के इतकं मतदान झालेलं आहे. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी १३.८२ टक्के मतदान झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ३.६० टक्के मते मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीत ९.०१ टक्के मते मिळाली आहेत.
निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा राहिला. भाजपने १५२ जागा लढवल्या. त्यातील १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८७ टक्के राहिला. शिवसेनेने ८१ जागा लढवत ५७ जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला.
साभार : प्रसार भारती












































































