Last Updated on 17 Mar 2024 10:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांसंदर्भात अद्ययावत केलेली माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.याआधी केंद्रीय निवडणूक आयोगानं बंद लिफाफ्यात ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती.ही माहिती सार्वजनिक करण्याच्या आदेशानंतर ती आता जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये निवडणूक रोख्यांसंदर्भातील तपशील जाहीर करण्यात आला असून,यात व्यक्तीने किंवा संस्थेने खरेदी केलेले रोखे आणि हे रोखे वटवून राजकीय पक्षांना मिळालेली रक्कम याची माहिती देण्यात आली आहे.
या निवडणूक रोख्यांच्या तपशिलातून मिळालेल्या माहितीनुसार,भाजपनं एकूण ६ हजार ९८६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले असून त्याखालोखाल तृणमूल काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे १ हजार ३९७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एकूण १ हजार ३३४ कोटी, बिजू जनता दलाला ९४४ कोटी,वायएसआर काँग्रेसला ४४२ कोटी तर तेलगू देसम पक्षाला १८१ कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत.












































































