Last Updated on 11 Feb 2023 8:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच आणि सदस्यांनी गावातील लोकांना सर्वोत्तम सुविधा देत त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न करावा.गावाच्या भौतिक सुविधाबरोबरच गावाचा शैक्षणिक आणि वैचारिक विकासही व्हायला हवा.आपण सर्वांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळा ‘मॉडेल स्कूल’, आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘स्मार्ट पीएसी’बनविण्यावर भर द्यावा,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे सर्जेराव यादव प्रतिष्ठान व वाळवा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुका ग्राम पंचायत मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते.आ.पाटील यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव यादव,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार,प्रा.शामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,उद्योगपती बाबुराव हुबाले,माजी पं.स.सदस्य आनंदराव पाटील, डॉ.कालिदास पाटील,शुभम यादव,संजय तांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आपण सौर ऊर्जा निर्मितीवर भर द्यावा. थकीत वीज बिल ही ग्रामपंचायतींसमोर गंभीर प्रश्न आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची योजना,स्ट्रीट लाईटसाठी सौर ऊर्जेचा वापर करावा. तसेच आप- आपल्या गावात लोकांना सौर ऊर्जा वापरास प्रवृत्त करावे. आपल्या गावात नरेगा योजने तून चांगले काम होवू शकते. मात्र त्यासाठी आपणास सर्वांना विश्वासात घेवून काम करावे लागेल.
प्रथम सत्रात अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी उपस्थित सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले. सौ.पवार म्हणाल्या,गावचा विकास हा महिलांच्या विकासावर अवलंबून असतो. गावातील महिलांनी सक्षमपणे उभे राहून ग्रामविकासामध्ये आपले योगदान दिल्यास गावात विविध योजना आणि उपक्रम राबवले जाऊ शकतात. महिला सक्षम झाल्या नंतर गाव सक्षम होऊ शकतो.सक्षम महिलांनी गावाचे नेतृत्व करावे आणि ग्राम विकासात ग्राम समृद्धीत आपला मोलाचा वाटा उचलावा. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गावे बदलत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील सरपंच रवींद्र माने मान्याचीवाडी यांनी यशस्वी गावाची यशोगाथा सांगताना महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार विजेत्या मान्याचीवाडी गावाचा विकास कसा झाला,याची माहिती दिली. कराड येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी ‘गाव विकासा’ बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक,युवा नेते राहुल महाडिक यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी वाळवे तालुक्यातील २०१८ ते २३ पर्यंत आदर्श काम केलेल्या साखराळे, कुरळप,येडेनिपाणी,मिरजवाडी,कामेरी, ताकारी,केदारवाडी या ७ गावांना सौ.पवार यांच्या हस्ते ‘आदर्श ग्रामविकास पुरस्कार ‘ देवून गौरविण्यात आले.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव यादव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. प्रा.दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. डॉ.सुरज चौगुले, सौ. मीरा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.













































































