Last Updated on 16 Nov 2024 2:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोरोना,महापूराच्या संकटाच्या काळात माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी अहोरात्र कष्ट घेत सामान्य माणसांना धीर दिला,मदतीचा हात दिला. त्यावेळी आपण कुठे होता? असा सवाल युवा नेते प्रतीक पाटील यांनी प्रचार दौऱ्यात बोलताना केला. सलग ३५ वर्षे कार्यकर्ते व सामान्य माणसांचे प्रेम,आशिर्वाद मिळविणे सोपे नाही. त्या साठी फार मोठी तपश्चर्या करावी लागते,असा टोलाही त्यांनी दिला. विरोधक अपप्रचार व दिशाभूल करीत आहेत, त्यास फसू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी वाळवा तालुक्यातील बोरगाव,शिगाव,भडकंबे, गोटखिंडी, मिरज तालुक्यातील दुधगाव, सावळवाडी,माळवाडी, मौजे डिग्रज, तुंग, कवठेपिरान आदी गावांचा प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण गेल्या काही महिन्यात मतदारसंघातील २५ पाणंद रस्ते केले असल्याचेही सांगितले.
प्रतीक पाटील म्हणाले,कोरोना व महापूराच्या काळात जे-जे करणे आवश्यक आहे,ते-ते आपण केलेले आहे. साहेबांनी सांगली जिल्ह्यात सुरू केलेला मॉडेल स्कुल, स्मार्ट पीएचसी हे प्रकल्प राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविले जात आहेत. साहेबांनी मतदारसंघात ५०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. विरोधक मात्र आपण केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. गाफील राहू नका. साहेबांचे काम आणि तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यत पोचवा. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर पंचसूत्रीच्या माध्यमातून महिला,युवक, शेतकरी व सामान्य माणसाच्या विविध कल्याणकारी योजना राबविणार आहोत.












































































