Last Updated on 26 Apr 2022 8:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
क्षारपड जमिनीतून पाण्याचा निचरा झाला म्हणजे जमिनीचा पोत सुधारेल,जमिनीची उत्पादक वाढेल. एक-दोन पिढ्यांचा विषय संपेल. त्यामुळे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने संमती पत्रे व आपल्या वाट्याची रक्कम भरून आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन राज्याचे जल संपदा मंत्री,जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी बोरगाव (ता.वाळवा ) येथील शेतकऱ्यांना केले.
बोरगाव (ता.वाळवा ) येथील मा.मोहनराव पतंगराव पाटील मल्टिपर्पज हॉलमध्ये जलसंपदा विभागाच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत भूमिगत चर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यां समोर ते बोलत होते. राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील,पाटबंधारे संशोधन विभागाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब गाडे,कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर,जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे,कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील,बँकेचे संचालक माणिक पाटील,युवा नेते अभिजित पाटील, संघाचे संचालक धैर्यशील पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
ना.पाटील म्हणाले,शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जे काढून,एकरी सव्वा लाख रुपये खर्च करून क्षारपड जमीन सुधारणा केली जात आहे. आपल्या गावात ४० लाख रुपयांची एक एकर जमीन फक्त १६ हजार रुपयात दुरुस्त होणार आहे. ही आपण शेतकऱ्यांच्यासाठी पर्वणी आहे. बोरगांव हे मला शिकविणारे व जागृत गांव आहे. आपण नक्की या प्रकल्पास उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल,याची खात्री आहे. आपण स्थानिक पातळीवर एखादी समिती करून लाभार्थी शेतकऱ्यांची संमती पत्रे व त्यांच्या वाट्याची रक्कम भरावी. त्यानंतर आपण निविदा काढून पावसाळ्यानंतर काम चालू करू. साधारण ७-८ महिन्यात काम पूर्ण होवून आपणास रिझल्ट मिळण्यास सुरुवात होईल.
माणिकराव पाटील म्हणाले,ना.जयंतराव पाटील यांच्या पुढाकाराने जल संपदा विभागाच्या माध्यमातून हा पथदर्शी प्रकल्प आपल्या गावात राबविला जात आहे. बोर गांवने सातत्याने विधायक कामाच्या मागे उभा राहिले आहे. या प्रकल्पातही संबंधित सर्व शेतकरी सहभागी होतील. गावातील सेवा सोसायट्या,पतसंस्थेच्या माध्यमातून आवश्यक तिथे लाभार्थी शेतकऱ्यास आर्थिक बळ देवू. बोरगांवमध्ये गेल्या २५-३० वर्षात झालेल्या शाश्वत विकासाचे सारे श्रेय ना. जयंतराव पाटील यांना जाते.
प्रिया लांजेकर म्हणाल्या,बोरगांवमधील १२२२ एकर क्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविला जाणार आहे. गावातील ५४३ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी एकरी १६ हजार रुपये भरायचे आहेत. शासन ८० टक्के खर्च करणार असून शेतकऱ्यांनी २० टक्के खर्च करायचा आहे.
बापूसाहेब गाडे म्हणाले,ना.जयंतराव पाटील यांनी १९८१ चा अध्यादेश बदलून वाळवा व मिरज तालुक्यातील इस्लामपूर, आष्टा,बोरगांव,तसेच कवठेपिरान,कसबे डिग्रज या ५ गावात हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी ९३ कोटी खर्च अपेक्षित आहे. यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे जलसिंचन अधिकारी डी.एम.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी ए.पी.पाटील,डॉ.सतीश सलगर,बाबासो चव्हाण,आनंदराव शिंदे, हणमंत पाटील यांच्या सह काही शेतकऱ्यांनी आपल्या मनातील शंका खुलेपणाने मांडल्या. त्यांना अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
प्रारंभी युवा नेते अभिजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शामराव वाटेगावकर,सर्जेराव देशमुख,उदय शिंदे, विलासराव शिंदे,शाखा अभियंता संजय हेळगुडे,प्रकाशराव पाटील,शिवाजी वाटेगावकर,सुरेश पाटील,मोहनराव शिंदे, पै.विनायक पाटील,पै.विकास पाटील, लालासाहेब वाटेगावकर,रणधीर पाटील, मानाजी पाटील,सुधीर पाटील,युवराज कांबळे यांच्यासह गावातील पदाधिकारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. युवा शेतकरी रणधीर शिंदे यांनी आभार मानले.








































































