Last Updated on 13 Dec 2023 8:34 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम मशीन) वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर,214 कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे,213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विवेक जाधव,सहायक नगर रचनाकार तथा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे पथक प्रमुख प्रतीक डोळे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या पथकाकडून यंत्राविषयी माहिती जाणून घेतली.ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रात जनजागृती व प्रात्याक्षिके चांगल्याप्रकारे करावीत. नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कसे काम करते हे समजावून सांगण्यासोबत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नव्हे आपल्या मताचे बुलेटप्रूफ कवच आहे, हे यंत्र कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त, विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञानाने आणि सांकेतिक लिपीबद्धतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याबाबत माहिती द्यावी.

ईव्हीएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबतीत अक्षम आहेत याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. नागरिकांचे नोदवहीत अभिप्राय घेवून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करावे,असेही त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा,असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा । लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट याबाबतची संपूर्ण माहिती करून घेण्याचे व पूर्व तयारीचा भाग म्हणून स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यांतर्गत आठही मतदार संघांना एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स वाटप करणेत आलेल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचने प्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृतीबाबत मतदारसंघ निहाय प्रत्येक तहसिल कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्याबरोबर मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचे गाव निहाय प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी राबविण्यात येत आहे.
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बद्दल होतेय जागृती

लातूर | जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात एलईडी रथ फिरणार असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यात ही जनजागृती मोहिम सुरु असून ती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या पत्रानुसार निवडणूक घोषित करण्याच्या तीन महिने आगोदर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्र व मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती याकरिता लातूर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व डब्ल्युपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती याकरिता भारत ईलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते अनिलकुमार व जितेंद्रकुमार यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व नायब तहसलिदार निवडणूक, लातूर जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स व अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित होते.












































































