Last Updated on 20 Feb 2026 4:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
◼ येत्या २७ फेब्रुवारी रोजी वाळवा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा
◼ शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
◼ वाळवा तालुक्यातील १४ गावांमधील शेतकरी एकवटले
ईश्वरपूर ।
महाराष्ट्र सरकारने ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या नावाखाली सुपीक जमिनी संपादित करण्याचा घाट घातला असून, या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या महामार्गाच्या विरोधात येत्या २७ फेब्रुवारी रोजी वाळवा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या संदर्भात नियोजनासाठी नवेखेड ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी. पाटील, कॉ. धनाजी गुरव आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी देशोधडीला लागणार : कॉ. धनाजी गुरव
यावेळी बोलताना कॉ. धनाजी गुरव म्हणाले की, वाळवा तालुक्यातील गौडवाडी, मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, उरुण-ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरलुप, वाशी, लाडेगाव आणि ऐतवडे बु. या १४ गावांच्या सुपीक शेतातून हा मार्ग जाणार आहे. यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असून, हा अन्याय वाळवा तालुका कदापि सहन करणार नाही.
क्रांतिकारी लढा उभा करू : बी.जी. पाटील
बी.जी. पाटील यांनी इशारा दिला की, वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. कोणत्याही गरजेविना लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या अन्यायाविरोधात सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे.
राजू शेट्टींच्या पावलावर पाऊल : भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी कोल्हापूरच्या लढ्याचा दाखला दिला. ते म्हणाले, “कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढा देऊन हा मार्ग रद्द करून घेतला. आता हाच मार्ग वाळवा तालुक्यातून नेण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसंगी रक्त सांडू, पण हा मार्ग होऊ देणार नाही.”
या बैठकीला होसेराव जाधव, सादिक पाटील, जालिंदर चव्हाण, निवास पाटील, नितीन पाटील, सोमनाथ जाधव, जयसिंग कोळी, बाबुराव जाधव, नाना कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या.












































































