Last Updated on 03 Mar 2026 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
बाल आणि युवा अवस्थेत मिळालेली शिकवण आणि संस्कार आयुष्यभर टिकतात. त्यामुळे नम्रता, धैर्य, प्रयत्नांमधले सातत्य, क्षमा आणि संयम या सदगुणांची जोपासना विद्यार्थी दशेतच करावी, असे आवाहन प्रा.डॉ. अशोक शिंदे यांनी केले.
येथील एस.डी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या आठवडाभर चाललेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कला- क्रीडा या स्वरूपाच्या स्पर्धांमधून मिळालेल्या पराभवातून अनुभव आणि विजयातून नम्रता शिकता येते. प्रत्येक दिवसाच्या वेळेचे,तासाचे नियोजन करून त्याचा योग्य वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयामध्ये “स्पंदन २०२६” अंतर्गत आयोजित कला व क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.जावरकर होते.
महोत्सवात विविध कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एस. व्ही.जावरकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम दिशा कोणत्या असाव्यात याविषयी विवेचन केले. उपप्राचार्य अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाल्याने त्यांच्यामधील सर्जनशीलता विकसित होते असे सांगितले. प्रा. मोहिनी पाटील, प्रा स्नेहा टिपूगडे, प्रा सुनिता पाटील, प्रा. प्रांजल पाटील यांच्यासह आशुतोष जगताप, पृथ्वीराज घोरपडे, निखिल पाटील, शुभांगी माळी, मेहेक मुल्ला यांनी संयोजन केले.








































































