Last Updated on 28 Mar 2026 1:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
वाळवा तालुक्यातील सुरूल, ओझर्डे आणि घबकवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून शासकीय अधिकाऱ्यांसमवेत ‘शिवार फेरी’ काढली. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या कामात होत असलेला दिरंगाई आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून आमदार खोत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या शिवार फेरी दरम्यान आमदार खोत यांनी सुरूल, ओझर्डे आणि घबकवाडी येथील तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या हे तलाव कोरडे ठणठणीत असून, पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ज्या तलावात आधीच पाणीसाठा आहे, तिथे पाणी सोडण्याचा अजब प्रकार अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावरून संताप व्यक्त करत आमदार खोत यांनी “शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, कामात तातडीने सुधारणा करा,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांना तंबी दिली.

पाईपलाईनची दुरवस्था आणि प्रलंबित कामे
रेठरेधरण, सुरूल आणि ओझर्डे येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी गळती (Leakage) लागल्यामुळे खराब झाली आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करून पाईप उघड्यावर टाकल्याने योजनेचा बोजवारा उडाला आहे. तसेच घबकवाडी येथील म्हातारा डोंगर ते सोनार खडीपर्यंतचा सर्व्हे पूर्ण होऊनही कामाला सुरुवात झालेली नाही. हे काम तिसऱ्या टप्प्यात असून त्याची निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यासाठी आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा मंत्र्यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या शिवार फेरीत वाकुर्डे योजनेचे सर्व अधिकारी, डी. के. पाटील, बजरंग कदम, अतुल पाटील, माजी सरपंच संजय कदम, सयाजीराव खोत यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असताना स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.










































































