Last Updated on 26 Mar 2026 8:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
शैक्षणिक संशोधन, ग्रंथलेखन आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रा. डॉ. जयवंत इंगळे यांना मुंबई येथील ‘छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्चुअल फोरम’ (Chhatrapati Higher Education Intellectual Forum) या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
राज्याचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते डॉ. इंगळे यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि सन्मान पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ. इंगळे यांनी केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता आपल्या ग्रंथ लेखनातून आणि संशोधन कार्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावली आहे. विशेषतः महात्मा गांधी, बॅरिस्टर पी.जी. पाटील यांचे विचार आणि आधुनिक काळाची गरज असलेली ‘सेंद्रिय शेती’ या विषयांवर त्यांनी युट्यूबच्या (YouTube) माध्यमातून चालवलेली प्रबोधनपर व्याख्यानमाला अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. त्यांच्या या डिजिटल आणि सामाजिक प्रबोधनाची दखल घेऊनच हा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीपराव पाटील यांच्यासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.










































































