Last Updated on 25 Jun 2023 1:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी : 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार
पुणे । मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे.पावसाच्या हजेरीने शेतकर्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.सध्या मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत एकाच दिवसात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो.मात्र,यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे.तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.राज्यातील वाशिम,सोलापूर,पुणे,छत्रपती संभाजीनगर,पालघर, वसई विरार,कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
मुंबईत मुसळधार पाऊस,दोघांचा मृत्यू
मान्सूनला सुरुवात होताच मुंबईत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील गोवंडी परिसरात दोन जण नाल्यात वाहून गेले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतही अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या आणि शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. चेंबूर परिसरात 80 मिमी पाऊस झाला. तर विक्रोळीत ७९ मिमी, सायन ६१ मिमी, घाटकोपर ६१ मिमी, माटुंगा ६१ मिमी पाऊस झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
बंगालच्या उपसागरात ओडिसा, पश्चिम बंगालपर्यंत चक्रिय स्थिती तसेच अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती तयार झाली आहे.या दोन्ही स्थितीमुळे मान्सूनने शनिवारी अलिबाग,मुंबई,कोल्हापूर,पुणे,नागपूरपर्यत धडक मारली.येत्या चोवीस तासात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे.तसेच 28 जूनपर्यत राज्यात चांगला पाऊस होणार आहे.
पुणे हवामान शास्त्र विभागाने ही माहिती दिली.बुधवारपर्यंत (28 जून) राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार,तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यांत कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.सध्या काेयना धरणात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.सोलापूर जिल्ह्यातही काही भागांत पाऊस झाला. नगर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते.पाथर्डी तालुक्यात हलकासा पाऊस झाला. कोपरगाव,संगमनेर तालुक्यांतील काही भागात पावसाने हजेरी लावली.
दरम्यान,पहिल्याच पावसात आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.आंबा घाटातील प्रसिद्ध गायमुख या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या छतावर दरड काेसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.सध्या आंबा घाटातील वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान,तब्बल 62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला आहे. यापूर्वी मान्सून मुंबई आणि दिल्लीत 21 जून 1961 रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आज मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख 11 जून तर दिल्लीत दाखल होण्याची संभाव्य तारीख 27 जून आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांमध्ये झारखंड, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पूर्व राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, किनारी कर्नाटक आणि केरळ.












































































