Last Updated on 21 Jan 2026 1:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर ।
जयसिंगपूरच्या सुकन्या ऊर्मिला अशोक पुरंदरे-अर्जुनवाडकर यांची अमेरिकेतील न्यूजर्सी प्रांतातील होपवेल टाऊनशिपच्या उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीमुळे जागतिकस्तरावर जयसिंगपूरचे नाव उजळले आहे.
ऊर्मिला अर्जुनवाडकर यांचे बालपण आणि शिक्षण जयसिंगपूरमध्ये झाले. शहरातील चौथ्या गल्लीत वास्तव्यास असलेल्या अर्जुनवाडकर कुटुंबातील त्या कन्या आहेत. ऊर्मिला यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने अमेरिकेच्या राजकारणात स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. गेली ४ वर्षे येथील नगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. याआधी २०२४ मध्येही महत्त्वाच्या पदाची त्यांनी धुरा सांभाळली होती. सामाजिक सेवेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आरोग्य, पर्यावरण विकास व संवर्धन, शहर संरचना या व इतर विभागांत केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्याकडे ही धुरा पुन्हा सोपवण्यात आली आहे.
जयसिंपूरमध्ये असताना देखील विविध क्रीडा व सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. त्यांनी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे विद्यार्थिनी प्रमुख पद ही भूषविले आहे. विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली होती व सांघिक सुवर्ण पदकही जिंकले होते.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. होपवेल टाऊनशिपच्या प्रशासनात आणि विकासकामात आता जयसिंगपूरच्या कन्येचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे.












































































