Last Updated on 02 Sep 2022 7:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोची | हिंदमहासागरात भारताचा दबदबा आता वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका दाखल झाली आहे. स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका बांधणीची क्षमता असलेला भारत चवथा देश झाला आहे. कोची शिप यार्ड येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ही विमानवाहू युद्ध नौका नौदलाल सुपूर्द करण्यात आली. यावेळी मोदी म्हणाले, मेड इन इंडियाची ताकद आज सर्व जगाला कळली आहे. या नौकेमुळे भारताची युद्ध क्षमता वाढणार आहे. देशांतर्गत विविध शस्त्रे उत्पादित केले जात आहे.आयएनएस विक्रांत मुळे हिंद महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. ही युद्ध नौका प्रत्येक भारतीयांचा स्वाभिमान आहे, असेही मोदी म्हणाले.
याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील राष्ट्रार्पण केले. हा ध्वज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला.

आजच्या भारतासाठी कुठलेही आव्हान कठीण नाही, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले. “आज भारत, स्वदेशी तंत्रज्ञानाने इतक्या महाकाय विमानवाहू नौका बनविणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आज आएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, देशात नवीन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पावर काम करणारे नौदल अधिकारी, कोचीन जहाज बांधणी केंद्राचे अभियंते, वैज्ञानिक आणि विशेषतः कामगारांचे अभिनंदन केले, त्यांची प्रशंसा केली. ओणमच्या शुभ आणि आनंदी मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाची स्वतःची गुणवत्ता आहे, शक्ती आहे, स्वतःची एक विकास यात्रा आहे. विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे प्रतीक आहे. याच्या एअरबेसमध्ये लावलेले पोलाद देखील स्वदेशी बनावटीचे आहे आणि ते डीआरडीने विकसित केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या विमानवाहू युद्धनौकेच्या भव्य क्षमता समजावून सांगताना नरेंद्र मोदी म्हणले, हे एक तरंगते शहरच आहे. यावर इतकी वीज निर्माण होते, की ज्यामुळे 5,000 घरांना वीज पुरवठा होऊ शकतो आणि यात वापरण्यात आलेल्या वायरिंगची लांबी इतकी आहे, ते कोची पासून काशीपर्यंत पोहोचू शकेल. पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून जे पंच प्रण सांगितले होते, त्याचेच मूर्तिमंत उदाहरण, आयएनएस विक्रांत आहे.
आयएनएस विक्रांत विषयी
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे
262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद असलेल्या विक्रांतचे वजन सुमारे 43,000 टन इतके आहे. याचा कमाल वेग 28 नॉट इतका असून, इंजिनाची कमाल क्षमता 7,500 नॉटिकल मैल इतकी आहे. ह्या जहाजावर 2200 कंपार्टमेंट्स असून 1600 कर्मचाऱ्यांची- ज्यात महिला अधिकारी आणि खलाशी यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही विमानवाहू नौका, अत्यंत उच्च दर्जाच्या मशीनरी चालवणाऱ्या, दिशादर्शक आणि स्वयंसंरक्षित अशा स्वयंचलित यंत्रणेने युक्त आहे. त्यावर अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा लावल्या आहेत.
मिग- 29, के लढाऊ जेट, कमोव्ह-31, MH-60R- ही लढावू विमाने ,बहुपयोगी हेलिकॉप्टर्स – अशी 30 विमानं तैनात आणि कार्यरत असण्याची या नौकेवर क्षमता आहे. त्याशिवाय, देशी बनावटीचे, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, आणि हलक्या वजनाची लढावू विमाने देखील इथून हालचाली करु शकतात. शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) ही नवी लढावू विमान संचलन व्यवस्था वापरण्यास सक्षम, असे विक्रांत, स्की-जंप सुविधेने युक्त आहे. तसेच, “अरेस्टर वायर्सचा संच यात आहे.

नौदलाचे नवे निशाण (ध्वज)
भारताच्या वसाहतवादी गुलामीच्या खुणा पूसून टाकण्याच्या संकल्पाला अनुसरून, भारतीय नौदलाच्या ध्वजाचे नव्याने आरेखन करुन, त्यात भारताच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा चिन्हांकित करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार, पांढरे निशाण, असलेल्या नौदलाच्या झेंड्यावर आता, दोन महत्वाचे घटक असतील- एक डावीकडे वर आपला तिरंगा ध्वज आणि नेव्ही ब्लू-म्हणजे गडद निळ्या रंगाचा – भोवती सुवर्ण अष्टकोन असलेली मुद्रा ध्वजदंडाच्या दुसऱ्या बाजूला मध्यभागी असेल. ह्या सुवर्ण अष्टकोनाच्या आत, अशोक स्तंभ हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे, तिथेच देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. त्याखाली, जहाजाचा नांगर आहे. त्याच्या खाली – ‘शं नो वरुण:’(वरुण देवाची आमच्यावर कृपा असावी) हे नौदलाचे बोधवाक्य सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे.
केरळचे राज्यपाल, आरीफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, व्ही. मुरलीधरन, अजय भट्ट, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नौदलप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.












































































