Last Updated on 10 Jul 2025 11:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’ अर्थात व्यास पोर्णिमा होय. महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले. या सर्व अलौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून, या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात.
आपल्या गुरूंना वंदन व त्यांचा आदर करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपोर्णिमा. गुरु आपणास नवी दृष्टी देतात. योग्य पद्धतीने आत्मज्ञान देतात.एकाग्रता, सहनशीलता, आज्ञाधारकता वगैरे गुण गुरुमुळे आपणास प्राप्त होतात.
गुरु विषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
गुरु शिवाय कोणालाही ज्ञान मिळत नाही. जगातील सर्व धर्मांनी गुरूला अग्रस्थान दिले आहे.
भारतीय संस्कृतीने तर गुरुला परमेश्वराचा अवतार मानले आहे. परमेश्वर सर्वांचा गुरु आहे. तरीही गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. मन्मथ स्वामी’परम रहस्य’ ग्रंथात म्हणतात,
शिव परब्रम्ह होय सही| परी भेटी बोलणे न घडे कही।
हा भेटी बोले समाधान करी सर्वही|
या लागी गुरु अधिक॥
याचा अर्थ असा की शिव हा परब्रह्म आहे. परब्रम्ह म्हणजे सर्वश्रेष्ठ असे तत्व. परंतु परब्रह्म शिव आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याशी कधी बोलत नाही. परंतु गुरु मात्र आपल्याला भेटतो आपल्याशी बोलतो. आपल्या मनातील शंकांचे समाधान करतो म्हणून शिवा पेक्षा श्रेष्ठ आहे.
संत कबीर म्हणतात,
गुरु आणि गोविंद दोघेही माझ्यासमोर उभे आहेत. मी आधी कोणाच्या पाया पडू असा मला प्रश्न पडला परंतु, मी आधी गुरूच्या पाया पडलो, गुरुनेच मला गोविंदाचे अर्थात परमेश्वराचे दर्शन घडवले. म्हणून गुरु श्रेष्ठ होय.
गुरु शिष्याला परमेश्वराचे दर्शन घडवितात. त्याला आत्मज्ञान देतात म्हणून गुरूला सर्व धर्मात श्रेष्ठ स्थान दिले जाते.
या दिवशी व्यास पूजनासाठी एका पाटावर अक्षतांवर सुपारी मांडाव्यात. आद्य गुरु भगवान श्रीकृष्ण, परम गुरु व्यासमुनी यांच्या प्रतिमा स्थापन कराव्यात. किंवा छायाचित्रे लावावीत.
‘मम सद्गुरु – उपासना सिद्ध्यर्यं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थम श्रीकृष्ण – व्यास-भाष्यकाराणां सहपरिवाणां कल्पोक्त – विधिनाम व्यासपौर्णिमा – प्रयुक्तं षोडशोपचार -पूजनं करिष्ये’॥
असा संकल्प करून प्रथम सुपार्यांवर देवतांच्या डावीकडून उजवीकडे क्रमाने श्रीकृष्ण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध या पंचदेवतांचे,
त्या पुढील रांगेत व्यास, सुमंन्तु जमिनी,वैशंपायन व पैल पंचदेवतांचे, तर या पुढील रांगेत, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, सनक, सनंदन, सनातन सनत्कुमा, गुरु, परम गुरु, परमेष्ठिगुरु, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद, पाद, शंकराचार्य व आपणास ज्ञात असलेल्या अन्य ब्रह्मनिष्ठांचे,
तसेच गणपती क्षेत्रपाल, दुर्गा सरस्वती आणि आठ दिशांना इंद्र, अग्नि, यम, निवृत्ती, वरूण, वायू सोम व ईशान यांचे आवाहन करून षोडोपचार पूजन करावे.
शेवटी
“निवसन्तु सुखेनात्र गमिष्याम:कृतार्थताम ।यथाशक्ति चे शुश्रूषां करिष्यामो वयं मुदा॥
असे म्हणून प्रार्थनापूर्वक निवेदन करावे.
पण ही पारंपरिक पूजा हल्ली तुरळक प्रमाणात आढळते. या ऐवजी तर बहुसंख्य लोक दत्तात्रय स्थाने आणि दत्तात्रयांची अवतारस्थाने यांचे दर्शन व पूजा करतात. उदा. औदुंबर, नरसोबावाडी इ. स्थानी जावून गुरुपोर्णिमा करताना दिसतात.
विरशैव लिंगायत धर्मामध्ये परमगुरु भगवान शिव व आपल्या इष्टलिंगास रुद्राभिषेक व पंचांचार्य पीठाची पूजा करून, गुरु जंगम आणि गुरु गादीला वंदन करतात. दर्शनासाठी जवळच्या शिव मंदिरात जाताना दिसतात.
थोडक्यात आपल्या गुरुबद्दलची निष्ठा सतत जागरूक ठेवण्याचा दिवस, तसेच ज्या गुरूंनी आपणास विशेष अलौकीक शास्त्रांचे ज्ञान दिले,
उदा. ज्योतिष, वास्तुशास्त्र, साहित्य, संगीत, योग, इ. गुरुंचा सन्मान, वंदन करून, दक्षिणा, वस्त्र, भेटवस्तू देऊन गुरूच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
तसेच आपले सर्व क्षेत्रातले मार्गदर्शक, शिक्षक, अध्यापक यांचाही सन्मान करून, त्यांचे ऋण व्यक्त करणे. तसेच आपला द्वेष करणारे आणि आपणास शारीरिक व मानसिक क्लेश देणारे लोक या नश्वर मानवी जीवनाची क्षणभंगुरता व दुःखमय अवस्था सांगून जातात. ते सुद्धा आपले गुरुच होत. कारण त्यांच्याकडूनही आपण काहीतरी शिकतच असतो. ही विशाल दृष्टी म्हणजे खरी गुरुपौर्णिमा होय.![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष, वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री – महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका – कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक, प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर, इस्लामपूर जि. सांगली.













































































