Last Updated on 10 Apr 2026 9:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
स्मशानभूमीत आढळले अघोरी साहित्य; ‘अंनिस’ कडून प्रबोधन
ईश्वरपूर ।
वाळवा तालुक्यातील शेणे येथे स्मशानभूमीमध्ये करणी आणि जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी कृत्यामुळे भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पुरोगामी वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसांत अशा स्वरूपाचे अनेक प्रकार वारंवार समोर येत आहेत.
शेणे येथील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींनी जादूटोण्याचे विधी केल्याचे दिसून आले. या ठिकाणी नारळ, लिंबू, काळी बाहुली, सुया, कोहळे आणि काळे कापड यांसारखे करणीचे साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले. हा प्रकार निदर्शनास येताच गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष जगन्नाथ शेटके यांनी तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला.
अंनिसची टीम घटनास्थळी पोहोचून प्रबोधन करण्यापूर्वीच, स्थानिक ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून हे सर्व साहित्य तिथून हटवले आहे. मात्र, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये असलेली घबराट लक्षात घेता, गावात लवकरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विशेष प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली.
अंधश्रद्धेला बळी पडू नका; गुन्हे दाखल करा
या घटनेबाबत बोलताना संजय बनसोडे म्हणाले की, “लोकांनी अशा करणी किंवा जादूटोण्यासारख्या प्रकारांना घाबरू नये. अशा अघोरी कृत्यांनी कोणाचेही चांगले किंवा वाईट करता येत नाही. असे प्रकार करून समाजाची दिशाभूल करणाऱ्या मांत्रिकांवर आणि बुवा-बांबांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल होऊ शकतात. नागरिकांनी अशा संशयास्पद हालचालींची माहिती ‘अंनिस’ला द्यावी, जेणेकरून आपण आपला समाज आणि कुटुंब या अनिष्ट प्रथांपासून दूर ठेवू शकू.”
हेही वाचा……………….












































































