मागील प्रश्नात वास्तु म्हणजे काय ?वास्तुआकार,भूमीप्लव,भूमीवाढ,कट,भूमीपरीक्षण,भूमीशुद्धी,भूमी अधिग्रहण,आय व्यय,वास्तु मुहूर्त,गृहारंभ दिशा,शंकु स्थापना इ. संदर्भात समजले.माझा आता असा प्रश्न आहे की,
प्रश्न.क्र.१३
शिलान्यास /अर्थात प्रथम बांधकामाची सुरवात प्रदक्षिणामार्गे कोणत्या दिशेतून व कशी करावी? त्यासाठी नंदा प्रतिष्ठापना /स्वस्तिक स्थापना कशी करावी?
उत्तर
कर्णे प्राग् दक्षिणे नन्दां वास्तुन:। स्थापयेदधअन्या: क्रमेण भद्राद्या: कोणेष्वन्येषु च त्रिषु॥
(मानसार)
सूत्रन्यास, भिंती बांधण्यास प्रारंभ, शिलान्यास ,स्तंभ उभारणे याचा आरंभ आग्नेय दिशेपासून करावा असे कश्यप ऋषींनी म्हटले.
वराहमिहिर यांच्या मतानुसार ईशान्य कोपऱ्यातून देखील बांधकामाची सुरूवात चालते.
पूर्वीच्या बांधकाम पध्दतीत शिला उभी केली जात असे मात्र ,आताच्या बांधकाम पध्दतीत प्रथम शिले ऐवजी काँक्रीटचा कॉलम किंवा वीट बांधकाम करून बांधकामाची सुरूवात केली जाते.
थोडक्यात गणपती ,पुण्याहवाचन पंचगव्य गंगाजल ,पद्म स्वस्तिक शुभचिन्ह रेखन,हळदी कुंकू अक्षता इ. सहित, पूर्णानाम्नेै शिलायै नम: या मंत्रानी षोडशोपचार पूजन ,पृथ्वी ,वराह, कूर्म,शेष देवता आवाहित करुन अष्टदिक्पाल बली(आवडता नैवेद्य),
शेवाळ ,पंचरत्न ,सप्तधान्य निक्षेप, इ.संपूर्ण विधी शुभ मुहूर्तावर पार पाडावा.
(संदर्भ-कृत्य दिवाकर पूजाविधी )
स्वस्तिक स्थापना
मयमतम अध्याय ९ मध्ये सांगितल्याप्रमाणे खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे साडेचार विटांचे स्वस्तिक तयार करावे.
पूर्वअग्नेय कडील वीट म्हणजे नंदा नामक विटेवर शं बीजाक्षर कोरावे दक्षिण-नैर्ऋत्येकडील विट म्हणजे भद्रा नामक विटेवर षं कोरावे ,पश्चिम-वायव्ये कडील विट म्हणजे जया नामक विटेवर सं कोरावे ,उत्तर-ईशान्ये कडील रिक्ता नामक विटेवर हं कोरावे. आणि मधील अर्धी वीट पूर्णा नामक वीटेवर ॐ कोरावे.
या साडेचार विटांचे स्वस्तिक तयार करुन पूजन करावे.
शंखनाद करत साडेचार विटा पैकी शं कोरलेली म्हणजे नंदा नामक वीट ही अग्नेय कोपऱ्यात प्रथमेष्टिका या नावाने स्थापन करावी.त्यानंतर षं नामक म्हणजे भद्रा नामक वीट नैऋत्य कोपऱ्यात स्थापन करावी. त्यानंतर सं म्हणजे जया नामक वीट वायव्य कोपऱ्यात,हं म्हणजे रिक्ता नामक वीट ईशान्य कोपऱ्यात ,आणि ॐ म्हणजे पूर्णा नामक वीट मध्यभागी स्थापन करावी.
नंदा प्रतिष्ठापना /प्रथमेष्टीका स्थापना
हेमायस्ताम्र रूपेश्र्श स्वस्तिकानी चतुर्दिशि ॥मयमतम अ.९
प्रश्न.क्र.१४
शूल आणि वेध म्हणजे नक्की काय? ग्रंथात कोणकोणते वेध आणि त्याचे परिणाम काय सांगितलेले आहेत.
मत्स्य पुराणात म्हटले आहे.की, तथा वास्तुषु सर्वत्र वेधं द्वारस्य वर्जयेत्।
वेध या शब्दांचा अर्थ विद्ध अथवा घाव घालणे असा होतो. एखाद्या वस्तूवर अन्य एखाद्या वास्तुमुळे बाधक परिणाम होतो त्यास वेध असे म्हंटले जाते.
उदा.
१) वृक्षवेध
वृक्षायुर्वेद ग्रंथात असे म्हटले आहे, सर्वासां वृक्षजातींना छाया वर्ज्जा गृहे सदा।
अपि साैवर्णिकं वृक्ष गृहद्वारे न रोपयेत् ॥
एखाद्या घराचे प्रवेशद्वारासमोरच एखादे झाड वाढून त्याची सावली त्या प्रवेशद्वारावर पडत असल्यास त्यास वृक्षवेध असे म्हटले जाते.
मत्स्यपुराणात खालील प्रकारे वेध सांगितले आहेत.
२)विधीशूला वेध
द्वारे तु रथ्थया विद्धे भवत्सर्व कुलक्षय:॥
एखाद्या बोळ किंवा रस्ता द्वारावर येऊन द्वार विद्ध होत असल्यास कुलक्षय संभवतो .
२)पङक् वेध
तरूणा द्वेषबाहुल्यं शोक पंङके्न जायते।
पङक म्हणजे द्वारासमोर चिखलाचा वेध झाल्यास तरुणात एकमेकांबद्दल द्वेष वाढतो
४)कूपवेध
अपस्मारो भवेन्नूनं कूपवेधेन सर्वदा ॥
घरासमोर कूप वेध म्हणजेच विहीर असल्यास अपस्मार नावाचा रोग उद्भवतो.
५)कील वेध
व्यथा प्रसवनेन स्यात्कीलेनाग्निभयं भवेत ।
कील वेध म्हणजे घरासमोर खिळा खुंटी रोवलेली असल्यास व्यथा झिरपत राहते.
६)मूर्तीवेध
विनाशो देवताविद्धे स्तंभेंन स्त्रीकृतो भवेत ॥
प्रवेशद्वारासमोर मंदिराची देवमूर्ती वेध करीत असल्यास विनाश संभवतो त्याचबरोबर स्त्रियांपासून क्लेश उद्भवतो.
७)स्तंभ ,अपवित्र द्रव्य,समोरच्या घराचा वेध
गृहभर्तुर्विनाश: स्याद गृहेन च कृते अभेध्यवस्करैर्विद्धे गृहिणी बन्धकी भवेत।
तथा सस्रभयं विन्धादन्त्यजस्य गृहेण तु ।
स्तंभ वेध झाल्यास स्त्रियांपासून क्लेश प्राप्ती होते.अपवित्र द्रव्यामुळे वेध झाल्यास स्त्री वंध्या होेते.
अन्त्यजाचे घराचा वेध झाल्यास शत्रूभय उपजते.
८)मर्मवेध
मयमतम मध्ये म्हटलं आहे,
मर्मशुलं च यत्नेन वर्जयेद् वास्तु कोविद: ।
सुत्रांदिनां गृहाङ्गैश्च पीडा चेत् सर्व नाशनम् ।
तस्मात् सर्व प्रयत्नेन सुत्रादीनि विवर्जयेत्।
विद्वान स्थपतीनी वास्तु नियोजन करताना मर्मस्थान विद्ध होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
समरांगणसूत्रधार मध्ये म्हटले आहे,
ज्ञात्वा सीरा: सानुसिराश्च नाडीर्वंशानुवंशानपी वास्तुदेहे ।
यत्नेन मर्माणि फलानि चैषां वेधं त्येजेद् यस्तमुपैति नापत् ॥
उपमर्द स्थानी वास्तू पीडित झाल्यास त्या ठिकाणी राहणाऱ्यांना सतत रोग उद्भवतो. मर्मस्थान होणाऱ्या वेधांमुळे कुल हानी संभवते.वास्तुपुरुष मंडळात शिरा- अनुशिरा ,नाडी ,वंश ,अनुवंश आणि मर्मस्थानांना प्रयत्नपूर्वक समजून उमजून त्यांचा वेध टाळून इमारत बांधण्यास कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवली जात नाही.
(मर्मस्थाने हा भाग आपण पुढील भागात समजून घेणार आहोत.)
मत्स्य पुराण अ.२५५ मध्ये म्हटले आहे.
उच्छायाद् द्विगुणां भुमिं त्यक्त्वा वेधो न जायते॥ १४॥
घराच्या उंचीच्या दुप्पट अंतर असलेल्या कोणत्याही होणार्या वेधाचा विचार करू नये असे
वरील सर्वांचा विचार करता असे लक्षात येते की ,दरवाजाच्या समोर कोणतीही वस्तू घराच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर असलेली समोर चालत नाही.अगदी छान दिसणारी कुंडीही,बाजुला मात्र चालते.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.