Last Updated on 21 Jun 2020 3:44 PM by
भाजी-फळे चिरत ग्रहणही पाहिले
सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात समृद्धी चंदन जाधव या गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या सुरु असलेल्या ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे.या महिलेने ग्रहण काळात भाजी चिरणे,फळे कापणे,झाडांची फळं-पानं तोडणं,अन्न खाणे,पाणी पिणे,हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या.तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतला. त्यांनी ग्रहणाच्या काळात अंधश्रद्धेतून निषिद्ध ठरवलेल्या अनेक दैनंदिन कृती करुन या अंधश्रद्धा झुगारल्या आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम करण्यात आला.
ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत.राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होते असे लोकांना वाटायचे.ग्रहणात हवा,पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता.त्यामुळे पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत,गर्भवती महिलांच्या बाबतीत तर ग्रहणाच्या अजूनच अंधश्रद्धा ऐकायला मिळतात.पण,इस्लामपूर येथे मात्र याला फाटा देण्यात आला

सौ. समृद्धी जाधव म्हणाल्या,आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृती केली.आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली.सासूबाई श्रीमती सिंधुताई जाधवचंदन जाधव,दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले.या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला.विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला करायला नको का? असा प्रश्न ही यावेळी समृद्धीने केला.
इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल म्हणाल्या ,अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे.ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही.बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते.गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.

प्रा. शामराव पाटील म्हणाले,अंनिस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते.ग्रहणाबाबत हे प्रबोधन लोकांच्यात मोठी जनजागृती करेल.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले,खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत.याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पार पडणाऱ्या युवतीचे कौतुक करावे इतके थोडे आहे.
यावेळी प्रा. डॉ अर्जुन पन्हाळे, अरविंद कांबळे, प्रा.राजा माळगी,विनोद मोहिते,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,संपत शिंदे उपस्थित होते.
प्रा.डॉ.नितीन शिंदे यांनी इस्लामपुरातून सूर्यग्रहणाचे फेसबुकवरून थेट प्रसारण करीत प्रबोधन केले आणि शास्त्रीय माहिती दिली. आपल्याकडे ग्रहण खंडग्रास पद्धतीने दिसते.ग्रहणाचा सुंदर नजराणा लोकांनी पाहिला.प्रा.पी एस पाटील,अवधूत कांबळे,योगेश कुदळे,प्रा.तृप्ती थोरात यांनी संयोजन केले.










































































