उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम : अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.साताऱ्याचा प्रसाद चौगुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे.याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे.तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.यातून मुख्य परीक्षेकरता ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.पूर्व परीक्षेनंतर निश्चित झालेल्या उमेदवारांची अंतिम परीक्षा १३ जुलै ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १ हजार ३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले.
उपजिल्हाधिकारी पदासाठी ४०,पोलिस उपधिक्षक आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी ३१,सहाय्यक कर आयुक्त १२,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी २१,वित्त आणि लेखा सेवा सहाय्यक संचालक ९,उद्योग उपसंचालक ६, तहसिलदार पदासाठी ७७ उमेदवार पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रसाद बसवेश्वर चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीमधून प्रथम आला.त्याने इंजिनिरिंगची पदवी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून घेतली आहे.तसेच प्रसादचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातून झाले आहे.त्याचे वडील शहापूर वीज वितरण कंपनीत नोकरीस आहेत तर आई गृहिणी आहे.प्रसाद याच्या निकालानंतर त्याच्या कोयना वसाहत येथील घरात अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे.विशेष म्हणजे प्रसाद २०१७ साली कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून इंजिनिरिंग झाल्यानंतर पुणे येथे कंपनीमध्ये नोकरीला लागला होता. मात्र आपण अधिकारीच व्हायचे हे ध्येय मनात ठरवून त्याने 1 वर्ष नोकरी केल्यानंतर राजीनामा दिला. आणि पूर्णवेळ स्पर्धापरिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यानंतर एकाच वर्षात या परीक्षेत यश मिळवले व राज्यात तो प्रथम आला.
तर उस्मानाबाद या जिल्ह्यातील रविंद्र आपदेव शेळके हा मागासवर्गवारीतून प्रथम आला आहे.तसेच महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी रविंद्र पाटील ही राज्यात प्रथम आली.सहाय्यक राज्यकर आयुक्त परीक्षेत गौरव मंगीलाल भालाघाटिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात अभिषेक दीपक कासोडे,सहायक संचालक वित्त व लेखा विभागामध्ये ज्ञानराज गणपतराव पोळ यांनी यश मिळविले.उद्योग उपसंचालक संवर्गात आकाश राजाराम दहाडे तर तहसीलदार संवर्गात ज्ञानेश्वर माणिकराव काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.उपशिक्षणाधिकारी संवर्गात राम शहाजीराव फरतंडे,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गात विकास भारतराव बिरादार,कक्ष अधिकारी संवर्गात मुकुंदराव विटेकर मुकूल,सहायक गट विकास अधिकारी अक्षय रमेश भगत,उपअधीक्षक भूमी अभिलेख संवर्गात शिवराज उमेश जाधव, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक अश्विनकुमार श्रीमंत माने,सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क संवर्गात श्रीकांत पांडुरंग कोकोटे,उद्योग अधिकारी संवर्गात भालचंद्र तात्यासाहेब यादव, सहायक प्रकल्प अधिकारी संवर्गात विजय साहेबराव साळुखे, नायब तहसीलदार संवर्गात अभिजित कैलाससिंग हजारे यांनी यश मिळविले आहे.
एमपीएससीच्या आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत यापूर्वी एमपीएससीने आपल्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आयोगाने नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे.
नवे वेळापत्रक
- राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२०: परीक्षेचा सुधारित दिनांक (१३ सप्टेंबर २०२०)
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०: परीक्षेचा सुधारित दिनांक (११ ऑक्टोबर २०२०)
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – २०२०: परीक्षेचा सुधारित दिनांक (१ नोव्हेंबर २०२०)