सांगली ।
पारतंत्र्याचे चटके सोसत असताना जनसामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी खा. स्व. एस. डी पाटील यांनी शिक्षणातून सुधारणेचा मूलमंत्र दिला, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या खासदार एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव ऍड. बी. एस. पाटील होते .प्रारंभी खा. एस. डी. पाटील यांच्या पुतळ्यास तसेच संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ना. जयंत पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फार्मसी कॉलेजच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ ना. पाटील यांच्या हस्ते झाला.
ना जयंत पाटील म्हणाले, आपला देश पारतंत्र्यात असताना तत्कालीन समाजव्यवस्था सुधारावी, देशाला स्वातंत्र्य मिळावे, उपेक्षितांना.. बहुजनांना शिक्षणद्वारे खुली करावीत या उदात्त हेतूने 1945 ला या संस्थेची खा.एस. डी. पाटील यांनी दूरदृष्टीने या संस्थेची स्थापना केली. पुढील काळात एड बी. एस. पाटील यांनी ही संस्था पायाभूत सुविधांसह वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आता या संस्थेला कालानुरूप बदलून नवे शिक्षणक्रम, नवे अभ्यासक्रम आणि त्याला माहिती तंत्रज्ञानाची, नाविन्याची जोड ऍड धैर्यशील पाटील देत आहेत, असे गौरवोद्गार ना. पाटील यांनी काढले. यावेळी ना पाटील यांनी धैर्यशील पाटील हे शिवाजी विद्यापीठ स्तरावर मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य म्हणून काम करताना अतिशय बारकाव्याने विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवून कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सध्याच्या शिक्षण पद्धती विषयी बोलताना ना.पाटील म्हणाले, सध्या स्पर्धेचे जग आहे .जो सर्वाधिक दर्जेदार व गुणवत्तेचे शिक्षण देईल तोच टिकणार आहे, जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी, शिक्षकांमधील देखील सुधारणांसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू केले आहेत.शिक्षणाला नव्या तंत्रज्ञानाची, सर्जनशील उपक्रमाची, नावीन्याची जोड देणे गरजेचे आहे. नवी पिढी खूप गतिमान आहे. त्याचा उपयोग योग्य व नाविन्यपूर्ण शिक्षणाद्वारे शिक्षण संस्थानी करून घेऊन उच्च शिक्षणाची व्यवस्था सुधारावी; अशीही अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
ॲड . बी .एस.पाटील म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी लोकनेते राजारामबापू पाटील आणि खासदार एस.डी.पाटील यांनी कासेगाव आणि वाळवा शिक्षण संस्थेची स्थापना करून या परिसरातील शिक्षण व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून आजही या दोन्ही संस्था सिस्टर एज्युकेशन सोसायटीज म्हणून सुसंगतीने दर्जेदार शिक्षण देत आहेत. आपल्या स्वागत प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव एडवोकेट धैर्यशील पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात 1945 ला या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर सध्या या शिक्षण संस्थेमध्ये 26शाखांमधून सुमारे पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्यवसायिक व कालानुरूप योग्य असा अभ्यासक्रम देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाई शहा, संस्था सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नगराध्यक्षा अरूणादेवी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवराज पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. जावरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या नवीन प्रस्तावित फार्मसी कॉलेज इमारतीची माहिती आर्किटेक्चर स्मिता माने यांनी दिली. प्रा. स्मिता डुबल व कु. ऐश्वर्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.