Last Updated on 11 Apr 2026 2:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
राजकारणात एक वेगळीच प्रवृत्ती तयार झाली आहे. न तत्त्वांची, न विचारांची…फक्त ‘संधी’ची!
आज इथे, उद्या तिथे, परवा पुन्हा पहिल्याच ठिकाणी. गट बदलणं जणू काही शर्ट बदलण्याइतकं सोपं झालं आहे.
राजकारण हा सध्या ‘तत्वांचा’ खेळ न राहता केवळ ‘सत्तेचा’ जुगार बनला आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे. विशेष म्हणजे, हेच लोक प्रत्येक वेळी नवीन व्यासपीठावर उभं राहून जुन्यांवर टीका करतात, आरोप करतात आणि काही दिवसांनी पुन्हा त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हा पॅटर्न सध्याच्या राजकारणात सर्रास पाहायला मिळत आहे. मात्र, अशा ‘संधीसाधूंवर’ मोठे नेतेमंडळी पुन्हा पुन्हा कसा विश्वास ठेवतात, हे एक मोठे अनाकलनीय आश्चर्यच ठरले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर किंवा सत्तेची गणिते जुळवण्यासाठी नेतेमंडळी अनेकदा ‘आयाराम-गयारामांचे’ स्वागत करतात. स्वतःच्या फायद्यासाठी निष्ठा गहाण ठेवणाऱ्या या दलबदलू लोकांमुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी पाहायला मिळते. ज्यांच्यावर कालपर्यंत टीका केली, त्यांच्याच गळ्यात गळे घालून फिरणारे हे संधीसाधू पुन्हा त्याच जुन्या नेत्यांना ‘बदनाम’ करायला मागेपुढे पाहत नाहीत. हे ‘संधीसाधू’ लोक नेत्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी होत असले, तरी त्यांची ही राजकीय चाल आता जनतेच्या पचनी पडत नाहीये.

गावात, गल्लीबोळात, चहाच्या टपऱ्यांवर चर्चा होते. “हा कुणाचा नाही… हा फक्त स्वतःचाच आहे!” जनतेला आता चेहऱ्यांपेक्षा ‘स्वभाव’ ओळखायला येतो. ती पाहते कोण ठाम उभा राहतो, आणि कोण फक्त फायद्यासाठी वाकतो.
थर्ड अंपायर म्हणून जनता शांत असली, तरी अंधळी नाही. ती प्रत्येक ‘रन’ नोंदवते, प्रत्येक ‘फाउल’ लक्षात ठेवते.
आणि योग्य वेळी…तीच निर्णय देते. संधीसाधू कितीही डाव बदलो, पण जनतेच्या नजरेतून सुटत नाही!
कारण शेवटी, विश्वास हा पक्ष बदलून मिळत नाही तो वागणुकीतून कमवावा लागतो!
थर्ड अंपायर
![]()














































































