Last Updated on 08 Mar 2026 9:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
पर्यावरण संवर्धनासाठी यावर्षीपासून पर्यावरणपूरक रंगपंचमीची सुरुवात स्वतःपासून करूया आणि निसर्ग रक्षणात आपला छोटासा पण महत्त्वाचा सहभाग नोंदवूया,” असा संदेश देत वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नैसर्गिक रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र (Botany) विभागामार्फत केवळ रंग खेळलेच नाहीत, तर नैसर्गिक रंग निर्मिती आणि विक्रीची कार्यशाळाही यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांनी कौशल्याचा नवा आदर्श समोर ठेवला आहे.

महाविद्यालयामध्ये संस्थेचे सहसचिव धैर्यशील पाटील तसेच प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक वारसा जपत हा पर्यावरणपूरक सण साजरा झाला. रासायनिक रंगांमुळे आरोग्याला होणारी बाधा टाळण्यासाठी बी.एस्सी. विभागातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक रंग निर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी पालक आणि कडुलिंबाच्या पानांपासून हिरवा, बीट, गुलाब आणि जास्वंदाच्या फुलांपासून लाल व गुलाबी, तर हळद आणि झेंडूच्या फुलांपासून आकर्षक पिवळा रंग तयार केला. या नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची महाविद्यालयात विक्रीही करण्यात आली, ज्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे उद्घाटन ॲड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एस. लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. यावेळी बी. एस्सी. विभागाचे समन्वयक प्रा. संतोष पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एम. व्ही. लोंढे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ सण साजरा न करता पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.










































































