Last Updated on 25 Feb 2026 4:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नदीत मृत मासे तरंगू लागले की, प्रशासनाला जाग येते. पळापळ होते, पाण्याचे नमुने घेतले जातात आणि अहवाल तयार होतो. पण पुढे काहीच घडत नाही! कृष्णा नदीत मळीयुक्त पाणी मिसळले, हजारो मासे मृत्युमुखी पडले, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, प्रशासनाने ‘तपास’ सुरू केला. पण खरे दोषी कोण आणि त्यांच्यावर कारवाई केव्हा?
मळी मिश्रित पाणी, औद्योगिक कचरा, गटारांचे सांडपाणी या सगळ्यामुळे कृष्णा नदी हळूहळू ‘जैवविविधतेचा कब्रस्तान’ बनत आहे. उन्हाळ्यात कोयना धरणातून येणाऱ्या पाण्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर मळीयुक्त पाणी नदीत सोडले जाते. परिणामी, प्राणवायूचे प्रमाण घटते आणि जलचरांसाठी मृत्यूचे तांडव सुरू होते.
फक्त चौकशी की कारवाईही होणार?
प्रत्येक वेळी चौकशीचा फार्स केला जातो. दोषींवर कारवाई करणार तरी कधी? का दरवर्षी नदीकाठच्या लोकांनी मृत माशांचे फोटो काढून प्रशासनाला जागे करायचे? हे फक्त पर्यावरणाचे नाही, तर आरोग्याचेही गंभीर संकट आहे.
प्रशासनाला जबाबदार धरायचे असेल, तर स्थानिकांनी यावर सातत्याने आवाज उठवला पाहिजे. चार दिवस गोंधळ घालून गप्प बसण्यापेक्षा, सरकारला आणि संबंधित अधिकाऱ्यांना उत्तरदायी ठरवले पाहिजे. नाहीतर पुढच्या वर्षीही हीच परिस्थिती असेल. नदीत मळी मिसळतच राहील, मासे मरतील, प्रशासन चौकशीचे ढोंग करेल आणि जनता पुन्हा मूग गिळून बसेल. पर्यावरणावर मोकळ्या हाताने घाला घालणाऱ्यांना ‘थर्ड अंपायर’ म्हणजेच जनता, आता ‘हिट विकेट’ करणार का? की पुन्हा हेच नाटक बघत बसणार?
– थर्ड अंपायर
‘कृष्णे’चा आक्रोश
कृष्णेच्या लाटांतून आवाज येतो,
“माझ्या पाण्याला विष का देता?”
निसर्गाच्या कुशीत मी वाहते,
माझ्या शुद्धतेला काळं का फासता?
कधी कारखान्यांचा गाळ येतो,
कधी शहरांचे सांडपाणी,
माझ्या पात्रात जीव मरतो,
कोण ऐकणार ही वेदना पुन्हा-पुन्हा?
गावकऱ्यांनी आवाज उठवला,
पण प्रशासन झोपेचे सोंग घेतं,
चौकशीसाठी येतात, फिरतात,
आणि कागदांवर सगळं मिटतं!
आज मासे मेले, उद्या पाणीही संपेल,
तुम्ही हसाल, पण निसर्ग रडेल,
माणसा, अजून वेळ आहे,
उठ, नाहीतर ‘काळ’ तुझ्या दारात उभा राहील!
– थर्ड अंपायर








































































