Last Updated on 09 Feb 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आ.जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. महायुतीच्या नेत्यांना मोठा धक्का मानला जातोय. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा फटका बसला.
जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील ११ गटांपैकी तब्बल ७ गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला एक जागा मिळाली, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. तर रयत क्रांतीला एक जागा मिळाली. या निकालामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे.

पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. वाळवा तालुक्यातील एकूण २२ गणांपैकी १४ गण राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकत पंचायत समितीवर पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना प्रत्येकी चार गणांवर विजय मिळवता आला. या निकालामुळे पंचायत समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकला आहे. या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचे नेते आ.सदाभाऊ खोत यांना मात्र दिलासा मिळाला. त्यांची सून मोहिनी खोत यांनी अवघ्या १३० मतांनी विजय नोंदवत यश संपादन केले.
जयंत पाटील यांनी स्वतः निवडणुकीत लक्ष घालून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही ठिकाणी यश मिळवण्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जिल्हा परिषदेत ११ पैकी ८ जागी वर्चस्व राखले. त्यात आपला सहकारी पक्ष उबाठा शिवसेना गटाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विजय मिळवला. तर पंचायत समितीत २२ पैकी तब्बल १४ जागांवर त्यांनी विजयी मिळवला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व करणाऱ्या गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ४ जागेवर पंचायत समिती मध्ये व एका जिल्हा परिषदेच्या जागेवर विजय मिळवला. अवघ्या २० ते १०० मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस श. प च्या ३ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा पराभव जयंत पाटील यांच्या समर्थकांनी केला.
संपूर्ण निवडणूक काळात जयंत पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून गावोगावी दौरे, सभा, बैठका घेत थेट मतदारांशी संवाद साधला होता. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासकामांचा लेखाजोखा मांडत भविष्यातील स्पष्ट दृष्टीकोन जनतेसमोर ठेवला होता. यामुळेच मतदारांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाच्या पारड्यात भरघोस मतदान केले.
निकाल जाहीर होताच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी जयंत पाटील यांचे फोटो हातात घेत जल्लोष करण्यात आला.
वाळवा तालुक्यातील निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळात तालुक्यातील विकास आणि राजकारणाची दिशा या निकालातून ठरलेली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कसं? साहेब म्हणतील तसं!
वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगला स्कोअर केल्याचा आनंद कार्यकर्त्यांना होताच. त्याच वेळी प्रत्येक जण जिल्ह्यात काय झाले? अशी एकमेकांना विचारणा करत होता. जिल्ह्यातही राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्तेपर्यंत मजल मारल्याचे लक्षात येताच “जिल्ह्यात कसं? साहेब म्हणतील तसं” चा निनाद घुमू लागला.











































































