Last Updated on 08 Feb 2026 7:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही
अहिल्यानगर |
औद्योगिक वसाहतीत शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुपा एमआयडीसीमध्ये स्थानिक पातळीवर उद्योजकांना त्रास देणाऱ्या किंवा धमकावणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. विकासात बाधा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इशारा दिला.
सुपा (ता. पारनेर) एमआयडीसी येथे ‘तौरल इंडिया’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उद्योगांच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी शासकीय नियमन यंत्रणा सक्षम आहेत. कोणत्याही खासगी व्यक्तीने किंवा गटाने कायदा हातात घेऊन उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही. सुपा एमआयडीसीमध्ये उद्योगांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळेल, याची ग्वाही शासन देत आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला आधीच कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
औद्योगिक विजेचे दर स्थिर राहणार
महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. उद्योगांसाठी ‘Cost of Doing Business’ कमी करण्यावर आमचा भर आहे. पुढील ५ वर्षांत औद्योगिक विजेचे दर स्थिर राहतील आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी कसा होईल, यादृष्टीने शासनाचे नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे पारनेर परिसरातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.











































































