Last Updated on 27 Jan 2026 11:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे. निर्भय आणि निपक्षपाती निवडणुका या लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचे आहेत.लोकशाहीच्या या उत्सावास करणी, जादूटोण्याचे अशा अंधश्रद्धाचा आधार घेतला जात आहे ही निषेधार्य बाब आहे. अशा घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारे आहेत. करणी आणि जादूटोणा किंवा तत्सम अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्या तातडीने कारवाई झाली पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.
नुकताच विटा येथे एका पुढाऱ्यांचा घरासमोर असे अंधश्रद्धेचे, करणी चे प्रकार करणाऱ्यास रंगेहात पकडले, संबंधित व्यक्तीला पोलिसाच्या हवाली केले. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी अशा प्रवृत्तींना वेळी रोखले पाहिजे, संबंधित जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे.
नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही असे अनेक करणी, जादूटोणाचे अघोरी प्रकार केल्याचे उघडकीस आले होते,त्या त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून लोकांच्या जनजागृती केली होती. विशेषता उमेदवार किंवा नेत्यांच्या घराजवळ असे प्रकार केले गेले होते. आष्टा, इस्लामपूर,कामेरी आदी ठिकाणी संघटनेने प्रबोधन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले होते. काही दिवसापूर्वी येलूर गावातही हयात नसलेल्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचे उघडकीस आले होते. असे प्रकार करणाऱ्या मांत्रिक,तांत्रिक,बुवाबाबांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, पोलिसांनी या बाबतील सोमोटो गुन्ह्ये दाखल करावेत. आवश्यकता असेल तिथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मदत करतील गावोगाव जाऊन प्रबोधन करतील. पोलीस खात्याने काही महिन्यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कक्ष करण्याचा आदेश पारित केला होता मात्र अद्याप सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये असा कक्ष झाल्याचा ऐकिवात नाही.
महाराष्ट्राला संत आणि सुधारकांचा बलदंड वारसा आहे. आपल्या संत सुधारकांचा वारसा समजून न घेतल्यामुळे अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याची वेळ आपल्या येत आहे.
करणी,जादूटोणा या बाबी पूर्णपणे भ्रामक आहेत, अवैज्ञानिक आहेत. करणी जादूटोणा किंवा देव घालून कुणाचं चांगलं किंवा वाईट करता येत नाही याची आम्ही खात्री देतो. करणी जादूटोणा किंवा देव घालण्याचे कुणाच्या कडे सामर्थ्य असेल तर त्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान आहे.अशा कोणत्याही चमत्कारिक गोष्टी सिद्ध करणाऱ्यास समितीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस आहे.आज अखेर ही आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. जादूटोणा किंवा करणी करून कुणाचं बरं वाईट करता येत असते तर भारताच्या सीमेवरील सैनिकाच्या ऐवजी हे तंत्र मंत्र करणारे लोकच ठेवले असते.
निवडून येण्यासाठी उमेदवार काय काय करतात हे आपल्याला ज्ञात आहे, नैतिकतेचा ऱ्हास होताना निवडणुकीत दिसत आहे त्यात अशा अंधश्रद्धांचा आधार ही बाब सुद्धा चिंताजनक आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धाचा आधार घेणे हा ज्ञानाचा विज्ञानाचा माणुसकीचा पराभव आहे. महाराष्ट्राचा सुद्धा निर्मूलन समिती गेली 36 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रभावी काम करीत आहे. प्रबोधनाच्या पातळीवर आम्ही नेहमीच सज्ज आहोत,लोकांच्या जागृतीसाठी आम्ही कार्यकर्ते तत्पर आहोत.












































































